| अलिबाग | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समस्यांबाबत अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत जिल्हास्तरावर फक्त बैठका घेतल्या जातात. अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातात. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर कधी येणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोविड प्रादुर्भाव संपुष्टात आल्यावर क्रीडा संकुलामधील केंद्र बंद करण्यात आले. आजही या संकुलात आरोग्य विभागाचे साहित्य पडून आहे. संकुल नादुरुस्त स्थितीत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील खेळावर व खेळाडूवर होत असल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीबाबत प्रशासन आजही दुर्लक्षित असल्याचे पहावयास मिळत आहे. यापुर्वी जिल्हा क्रिडा संकुल समितीची बैठक मुंबईत तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली 2022 मध्ये झाली होती. या बैठकीत संकुलाच्या दुरुस्तीबाबत एजन्सी नेमण्याबाबत निर्णय घेतला होता. लहान मोठ्या दुरुस्त्या करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतर कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झाली नाही.
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलाच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा समाचार जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश देण्यात आले. त्यानंतर त्यांनी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीबाबत माहिती घेतली. तरीदेखील त्या इमारतीवर पुन्हा करोडो रुपये दुरुस्तीसाठी केले जात आहेत, ही मोठी शोकांतिका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रुग्णालयातील कर्मचारीदेखील या जीर्ण इमारतीबाबत चिंताग्रस्त आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी वारंवार बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना देतात. मात्र या सूचना फक्त कार्यालयाच्या चार भिंतीच्या पलिकडे जात नसल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. रुग्णालयाला स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भेट देऊन तेथील दुरवस्थेची पहाणी केली. त्यामुळे बैठका संपल्यावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती सध्या सुरु आहे. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी फक्त निर्दशच देणार की ॲक्शन मोडवर कधी येणार, असा प्रश्न रायगडकरांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
पुढे काहीच नाही.. रुग्णालयाची इमारत सलाईनवर असून अनेक वेळा स्लॅब कोसळले आहेत. काहीजण जखमी झाले आहेत. याबाबत कृषीवलने अनेकदा आवाज उठविला आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी देखील रुग्णालयाला अचानक भेटी दिल्या आहेत. मात्र, रुग्णालयाच्या कामकाजात काहीच गती दिसून येत नाही. पुढे काहीच नाही, अशी परिस्थिती असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये नाराजी आहे.