| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत आहे. अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी येथे ट्रामा केअर सेंटर दोन वर्षापूर्वीच मंजूर झाले आहे, मात्र त्याच्या उभारणीला सरकारला अद्याप मुहूर्त सापडला नाही. अजून किती जणांचा बळी घेणार, असा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा व दिघी-पुणे अशा महत्वाच्या राज्य मार्गावर अनेक वेळा विविध अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज आहे. त्यामुळे माणगावची आरोग्य यंत्रणा अधिक बळकट होणार आहे. मात्र गेल्या दोन वर्षात या सेंटरची एक वीटदेखील लागलेली नाही. फक्त कागदावर असणाऱ्या या सेंटरची तातडीने उभारणी करण्याची मागणी जोर धरत आहे.
माणगाव हे महामार्गावरील महत्वाचे ठिकाण असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, दापोलीसह दक्षिण रायगडमधील पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, रोहा, तळा, पाली येथूनही रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात. ट्रॉमा केअर सेंटर व सिटीस्कॅन मशीन कार्यान्वित झाल्यास माणगावात रुग्णांवर निदान व उपचार होऊन त्या रुग्णांना जीवदान मिळणार आहे.
गेल्या 10 वर्षांत या महामार्गावरील अपघातात 2010 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या 5 हजारच्या वर आहे. सरकारने तातडीने मंजूरी दिलेल्या ट्रामा केअर सेंटरची उभारणी केल्यास अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यास मदत मिळणार आहे.







