तालुका टंचाईमुक्त कधी होणार?

ठोस उपाययोजना करण्याची मागणी

| माणगाव | प्रतिनिधी |

शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत जलजीवन मिशन योजनेमधून माणगाव तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम शासनाने गेल्या वर्षापासून हाती घेतले असून, वर्षोनुवर्षे या तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट करण्यात येतात. मात्र, यावर शासन ठोस उपाययोजना कधी करणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही माणगाव तालुक्यातील यंदाच्या वर्षी काही गावे व वाड्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत.

सन 2021-22 मध्ये जलजीवन मिशनमधून विविध गावांतील पाणीपुरवठा योजनांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु केली असून, काही गावातील योजनांचे विहीर व पंपघरांचे काम पूर्ण झाले आहेत. तर, काही गावातील विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून, पाईपलाईनची कामे प्रगतीपथात आहेत. काही ठिकाणी साठवण टाकीची कामे सुरु आहेत. ही कामे गेल्यावर्षी पूर्ण झाली असून, 11 गावांतील या योजनेतून पाणी वितरणाच्या चाचणीचे काम सुरू आहे. 147 योजना तालुक्यात मंजूर झाल्या, त्यापैकी 137 योजनांची कामे सुरु आहेत. त्यामुळे या योजना डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होऊन ही गावे शासनाच्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यातून मुक्त होतील, अशी आशा वाटत आहे.

पाणीयोजनेवर करोडोंचा खर्च
माणगाव तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत 147 पाणीयोजना मंजूर असून, त्यापैकी 137 पाणी योजनांची कामे सुरु आहेत. यासाठी 138 कोटी रुपये या पाणीयोजनेवर खर्ची पडणार आहेत. सध्या तारणे, बोरघर, उंबर्डी, रातवड, पन्हळघर बु., वाढवण, मुगवली, जावळी, खरवली-उमरोली, रानवडे कोंड, मंगरूळ या 11 गावातील पाणीयोजनेची कामे पूर्ण झाली असून पाणी सोडण्याची चाचणी सुरु आहे.

Exit mobile version