पालीच्या मुलभूत समस्या सुटणार तरी कधी?

नागरिकांची राजकीय पक्षांकडे विचारणा
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायतच्या 4 प्रभागांसाठी 18 जानेवारीला निवडणूक होत आहे. मात्र येथील 4 जागांसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. एकाच पक्षात अनेक उमेदवार बाशिंग बांधून आहेत. आपल्याला उमेदवारी न मिळाल्यास पक्षांतर्गत बंडाळी करण्याच्या मार्गावर ते आहेत. तर यावेळी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार देखील होण्याची शक्यता आहे.पाली शहराच्या मुलभूत समस्या सुटणार तरी कधी,अशी विचारणा आता मतदार करु लागलेले आहेत. प्रभाग क्रमांक 2 व 14 साठी सर्वसाधारण महिला आणि प्रभाग क्रमांक 5 आणि 8 साठी सर्वसाधारण खुला असे आरक्षण पडले आहे. यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत 29 डिसेंबर ते 3 जानेवारी अशी आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्याआधी या 4 जागांसाठी 19 नामनिर्देशन पत्र आली होती. इच्छुक उमेदवारांची संख्या पहाता नवीन नामनिर्देशन पत्र वाढण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही कोणत्याच पक्षांचे उमेदवार नक्की झालेले नाहीत. केवळ चर्चा आणि बैठका सुरू आहेत. एकाच पक्षात अनेक उमेदवार इच्छुक असल्याने नक्की कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत पक्षश्रेष्ठी देखील संभ्रम व द्विधामनःस्थितीत आहेत. उमेदवार निवडीसाठी मग मतदार संघात बैठका व आढावा घेतला जात आहे. उमेदवारी न मिळाल्यास अनेकांनी अपक्ष उभे राहण्याची तयारी देखील दर्शविली आहे.


13 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना व भाजप वेगवेगळे लढले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकाप यांनी आघाडी करून निवडणूक लढविली. मात्र आता हे चार उमेदवार नगराध्यक्ष ठरविण्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेली ही नगरपंचायत सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. मागील वर्षानुवर्षे येथील असंख्य प्रश्‍न व समस्या जैसे थे आहेत. आम्हाला सत्ता दिल्यास हे सर्व प्रश्‍न आम्हीच मार्गी लावू अशी आश्‍वासने सर्वच पक्षांचे नेते, मंत्री, आमदार व खासदारांनी प्रचारादरम्यान दिली आहेत. याशिवाय तीर्थक्षेत्र विकास नाही, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे.कचरा व सांडपाण्याचे नियोजन नाही,, नवीन बस स्थानकाला मुहूर्त नाही ग्रामीण रुग्णालय प्रलंबित आहे.याकडेही नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.


शुद्धपाणी योजना प्रलंबित
पाली शुद्ध नळपाणी पुरवठा योजना मागील 15 ते 20 वर्षांपासून प्रलंबित आहे. सद्यस्थितीत जवळपास 12 कोटींची शुद्ध नळपाणी योजना अजूनही कार्यान्वित झालेली नाही. इतक्या वर्षांत कोणालाच ही योजना अंमलात आणता आली नाही. त्यासाठी नगरपंचायतीची वाट पहावी लागली का ? असा सवाल जनता विचारत आहे.

बाह्यवळण मार्ग अडचणीत
राज्यशासनाने सन 2010 ला वाकण पाली खोपोली राज्यमार्गावर बलाप येथून बाह्यवळण मार्गाला मान्यता दिली आहे. तसेच रस्त्यास 18 कोटी तर भूसंपादनासाठी 10 कोटींची मंजुरी मिळाली होती. सदरचा मार्ग हा पाली पाटनुस राज्यमार्ग 94 ला झाप गावाजवळ जोडला आहे. या मार्गालगत येणार्‍या शेकडो शेतकर्‍यांच्या पिकत्या जमिनी नष्ट होणार असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे मार्ग याबात तोडगा निघालेला नाही. हा मार्ग अडचणीत अडकला आहे. त्यामुळे पालीत सतत वाहतूक कोंडी होते.

Exit mobile version