चिल्लार नदीवरील पुलाचे रस्ते कधी होणार?

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील अंत्राट खुर्द आणि अंत्राट वरेडी हि दोन्ही गावे जोडण्यासाठी चिल्हार नदीवर पूल बांधण्यात आला आहे. सरकारने त्या पुलासाठी 60 लाख रुपये खर्च केला आहे. मात्र, त्या पुलाला जोडणारे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले नाहीत. दरम्यान, पुलाची निर्मिती होऊन चार वर्षाचा कालावधी लोटला तरी दोन्ही गावे जोडणारे रस्ते बनविले गेले नाहीत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्जत तालुक्यातील दोन्ही अंत्राट गावे जोडणारा पूल चिल्हार नदीवर बांधण्यात आला आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी बांधकाम विभागाने 60 लाख रुपये खर्च केले असून त्या पुलाची निर्मिती करण्याचा उद्देश हा प्रमुख दोन्ही अंत्राट गावे जोडून पावसाळ्यात आणि उन्हाळयात या गावांचा संपर्क तात्काळ होण्यासाठी हा पूल महत्वाचा होता. त्यामुळे अंत्राट वरेडी भागातील शेतकर्‍यांनी पुलाच्या बांधकामासाठी जागा दिली आणि रस्तादेखील बनविण्यास जागा दिली. नेरळ-पिंपळोली-गुडवण या रस्त्यावरून चिल्हार नदीवरील नवीन पुलापर्यंत 400 मीटरचे अंतर असून त्या रस्त्यासाठी शेतकर्‍यांनी जागा सोडून दिली असल्याने त्या मातीच्या रस्त्याने वाहनांची ये-जा उन्हळ्यात सुरु असते. मात्र, पलीकडे जाधवांच्या अंत्राट गावातील शेतकर्‍यांनी अद्याप पुलाकडे जाणारा रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बांधलेला पूल हा सध्यातरी निरुपयोगी ठरत आहे.

या पुलाच्या निर्मितीचा निर्णय हा शासनाने दोन्ही बाजूची गावे जोडली जावी हा होता. पुलावरून वाहनांची ये-जा करण्यासाठी रस्ता असायला हवा. मात्र, दोन्ही बाजूला रस्ते बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले नाही. त्याचा परिणाम चिल्हार नदीवरील तो पूल केवळ शोभेचे बाहुले बनून आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने स्थानिक शेतकर्‍यांना विश्‍वासात घेऊन रस्त्यासाठी कमीतकमी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पुढे येत आहे. अंत्राट वरेडी येथील स्थानिक ग्रामस्थ गोपाळ डायरे यांनी आपल्या बाजूने रस्तासाठी कोणत्याही अडचणी नाहीत. शासनाने रस्ता मंजूर करावा, आम्ही सर्व ग्रामस्थ उभे राहून रस्ता तयार करून घेऊन, असे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे आता जाधवांच्या अंत्राट गावातील ग्रामस्थांच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version