। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात सुट्ट्या सुरू झाल्याने कर्जत येथील चार फाटा आणि श्रीराम पुल हे वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रेल्वेमार्गावर नवीन पुल आणि श्रीराम पुलाच्या ठिकाणी बांधण्यात येणार्या नवीन पुलाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशी मागणी पुढे आली आहे.
कर्जत तालुका सध्या पर्यटनात आघाडीवर आहे. या तालुक्यात पर्यटनासाठी वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी होत असून मुंबईपासून पुढे कर्जतकडे येणार्या चौक रस्त्यावर वाहनांची कोंडी होते. परिणामी चार फाटा आणि श्रीराम पुल येथे वाहनाच्या रांगा लागतात. त्यामुळे कर्जत तालुक्यातील रस्ते वाहतूक कोंडीच्या अग्रस्थानी आले आहेत. गेली काही वर्षे सातत्याने कर्जत चार फाटा आणि श्रीराम पुल येथे होणार्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी प्रशासन कोणत्याही हालचाली करताना दिसत नाही. मध्य रेल्वेच्या मार्गावर नवीन पुल झाला असता तर कर्जत शहरातून येणार्या वाहनांची वाहतूक कोंडी रेल्वे पुलावर झाली नसती. तर, कर्जत चार फाटा येथील अतिक्रमणे तोडल्यानंतर रस्त्याची रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात आलेली नाहीत. परिणामी चार फाटा वाहतूक कोंडीचा केंदेबिंदू बनला आहे. तर श्रीराम पुलाच्या बाजूला नव्याने सुरू असलेल्या पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर कदाचित हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त झाला असता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाच्या कामाला गती देण्यात येत नसल्याने स्थानिकांसह वाहनचालक प्रचंड नाराजी व्यक्त करित आहेत.







