शासकीय दवाखाना केव्हा होणार?

विविध संघटनांचे तहसीलसमोर लाक्षणिक उपोषण
दोन महिन्यांत कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती
वावोशी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील पाली फाटा जवळील पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेली 3 एकर जागा उपलब्ध होऊन त्याची रीतसर मोजणी होऊन देखील शासकीय रुग्णालयाचे घोडे नेमके अडले कुठे असा संतप्त सवाल करीत संघर्ष समिती,पोलीस मित्र संघटना आणि आप पार्टीकडून खालापूर तहसील कार्यालयासमोर दिनांक 13 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना फोनद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड यांच्याकडून 2 महिन्यातच शासकीय दवाखान्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे आश्‍वासन उपोषणकर्त्यांना देण्यात आले आहे.
पाली फाटा येथील शासकीय दवाखाना आणि खोपोलीतील सुभाषनगर येथील संरक्षक भिंत हे दोन्ही विषय नागरिकांच्या हिताचे आणि आरोग्याच्या दृष्टीने निगडित असलेले दोन्ही महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी न लागल्याने 13 ऑगस्ट रोजी खालापूर तहसील कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार इरेश चप्पलवार, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड, उपोषणकर्ते संघर्ष समितीचे संयोजक हनुमंत ओव्हाळ, गोपीनाथ सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते सतीश रावळ, आम आदमी पार्टीचे खोपोली शहर अध्यक्ष गयासुद्दिन खान, पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा महासचिव खलील सुर्वे तसेच संघर्ष समितीचे संयोजक वसंत केदारी, अनंत शिंदे, हरीश केदारी, पत्रकार प्रेमनाथ जाधव, राजू भालेराव, अशोक गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version