तळ्यातील नागरिकांचे स्थलांतर थांबणार कधी?

घरदार आई-वडिलांना सोडून मुंबई, ठाणेकडे कामाला
। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्याची निर्मिती होऊन 24 वर्षे उलटली आहेत. परंतु आजतागायत या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील युवकांना पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने आपले घरदार, वयोवृद्ध आईवडिलांना सोडून मुंबई, ठाणे,दिवा, नालासोपारा या भागात राहण्यास जावे लागत आहे.गेली कित्येक वर्षे अशीच परिस्थिती कायम असल्याने तळा तालुक्यातील नागरिकांचे स्थलांतर थांबणार तरी कधी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

तालुक्यातील बहुतांश नागरिक शेती करून त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह भागवितात.मात्र हल्ली वाढलेली महागाई, बी- बियाणांचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी यामुळे नागरिकांना शेती करणे परवडत नाही. अशातच सर्व सहन करून शेती केलीच तर माकडे,डुक्कर या वन्य प्राण्यांकडून शेतीची नासधूस केली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी शेती करणे सोडून दिली आहे. मात्र पोटाची खळगी भरायची कशी हा प्रश्‍न निर्माण होत असल्याने नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधात स्थलांतर करावे लागत आहे.त्यामुळे हाताला काम मिळेल,त्या दिशेने तालुक्यातील युवक जात आहेत.

गावातील नेतेमंडळींनी फक्त गावातील भौतिक सुख सुविधा देत सरकारच्या निधीतून कामे केली. परंतु येथील माता-भगिनी, युवक आणि ज्याला कामाची गरज आहे, अशा हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यात सर्वच राजकारण्यांना अपयश आले आहे.वास्तविक पाहता खेडोपाडी 60 टक्के नागरिक गाव सोडून गेले आहेत.तसेच दिवसेंदिवस स्थलांतराची संख्याही वाढत आहे. गावात युवकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी शिल्लक राहिली आहे. केवल वयोवृद्ध नागरिक आपले घर राखण्यात धन्यता मानून गुजराण करत आहेत.काही गावात तर मुंबईकर आल्याशिवाय मृत देहावर अंत्यसंस्कार सुद्धा होणे कठीण होऊन बसले आहे.

रोजगारनिर्मिती करण्यात लोकप्रतिनिधी कमी पडल्याने तसेच गावात शेती करणार्‍यांना लग्नासाठी कोणी मुलगी देत नसल्याने तरुणांना गाव सोडावे लागते.रोजगार नसेल तर कुटुंब कसे चालवायचे यासाठी शहराकडे गेलेले कुटुंब शहरात तुटपुंज्या कमाईमध्ये उदरनिर्वाह भागवित आहेत.अशातच दिवसेंदिवस वाढती महागाई लक्षात घेता शहरात संसार चालविणे देखील त्यांच्यासाठी कठीण होऊन बसले आहे.हे वास्तव फार कठीण आहे.

प्रदूषणमुक्त कारखान्यांची आशा
काही गावात तर मुंबईकर आल्याशिवाय मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार सुद्धा होणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे पोटापुरती असलेली शेती सुद्धा ओसाड राहून गेली आहे. हे वास्तव्य फार कठीण आहे. या भागात प्रदूषणमुक्त कारखाने आल्यास स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, अशी आशा युवकांना आहे. परंतु हे कोण व कधी होणार? हाच मोठा प्रश्‍न आहे.

Exit mobile version