| अलिबाग | प्रतिनिधी |
गेली जवळपास 14 वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. मात्र, अद्यापही हा मार्ग अपूर्णच आहे. महामार्ग बनविणार, तारीख नाही सांगणार, अशी आश्वासने सरकारकडून गेली कित्येक दिवस दिली जात आहेत. परिणामी, या मार्गावर अनेक अपघात घडत असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या महामार्गाचा वनवास नेमका संपणार तरी कधी, असा संतप्त सवाल शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला आहे.
मुंबई-गोवा मार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून, अनेकांना कायमचे अपंगत्वदेखील आले आहे. जिल्ह्यात पर्यटनाबरोबरच औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहनांची संख्यादेखील वाढू लागली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारने चारपदरी रस्ता करण्याचा निर्णय घेतला. 2008 पासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. या महामार्गासाठी 942 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, काम वेळेवर पूर्ण करण्यास सरकार अपयशी ठरल्याने या महामार्गासाठी दोन हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. त्यामध्ये डांबरीकरण, काँक्रिटीकरण, खड्डे दुरुस्तीची अनेक कामे करण्यात आली आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करूनही या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह पर्यटकांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत.
सरकारने महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत अनेकदा आश्वासने दिली. मार्ग पूर्ण व्हावा, यासाठी अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने, उपोषणे केली. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच आली. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची तारीख दिली जाते. मात्र, त्या मुदतीत काम पूर्ण होत नाही. जलदगतीने काम पूर्ण होण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे या महामार्गाला मुहूर्त कधी लागणार, असा सवाल आ. जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
पाच वर्षांत 1 हजार 27 अपघात रायगड जिल्ह्यात 2019 ते 2023 या पाच वर्षांच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर 1 हजार 27 हून अधिक अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 314 जण जागीच मयत झाले आहेत. पाच वर्षांच्या तुलनेत 2019 मध्ये 67 आणि 2023 मध्ये 74 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे 2023 मध्ये सर्वात जास्त मृत्यू झाल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. तसेच 852 जणांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. 2019 मध्ये 278 आणि 2023 मध्ये 187 जण गंभीर जखमी झाले आहेत. या कालावधीत 2019 मध्ये सर्वात जास्त जखमी झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.