पर्यटकांसह नागरिकांचा प्रशासनाला सवाल
| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुडच्या परेश नाका ते मारुती नाका रस्त्यावरील तहसीलदार कार्यालयासमोर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे खड्डे बुजविणार कधी? असा सवाल पर्यटक, वाहनचालक व नागरिकांतून प्रशासनाला विचारला जात आहे.
मुरूडमधील परेश नाका ते मारुती नाका मुख्य रस्त्यावर तहसीलदार कार्यालय, वनविभाग, सेतू, न्यायालय व टपाल इत्यादी महत्वाची कार्यालये असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वदर्ळ असते. या रस्त्यावर खड्डे पडले असून वेळेप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष पुरवून येथील खड्डे बुजविण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, संबधित बांधकाम खात्याने या रस्त्यावरील खड्डे बुंजविले होते. परंतु, भर पावसात बंजविण्यात आलेले खड्डे किती दिवस तग धरून राहतील, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आणि काही दिवसांतच पुन्हा परिस्थिती जैसे थेच झाली. त्यामुळे संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी पर्यटक, प्रवासी व नागरिकांतून केली जात आहे.
