शहरासह तालुक्यामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यामध्ये मागील दोन आठवड्यांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परंतु, पावसाला सुरुवात झाल्यानंतर महावितरणचा वीज पुरवठा लागलीच खंडित होतो. महावितरण कडून पावसाळा वगळता महिन्यातून दोन ते तीन वेळा देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. तर, पाभरे येथील विद्युत केंद्रापासून श्रीवर्धन येथील उपविद्युत केंद्रापर्यंत येणार्या वीजवाहिन्या या जंगल मार्गातून येत असल्यामुळे सदर वीज वाहिन्यांच्या बाजूला वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठीदेखील अनेक वेळा वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. परंतु, एवढे सगळे खटाटोप करूनसुद्धा पावसाला सुरुवात झाल्याबरोबर वीजपुरवठा खंडित होतो.
श्रीवर्धन म्हसळा या तालुक्यांची भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणच्या मुख्य विद्युत वाहिन्या या भूमीगत असणे आवश्यक आहे. कारण, श्रीवर्धन तालुका सध्या पर्यटनाच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात बहरलेला आहे. या ठिकाणी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येतात. पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमाण जरी कमी असले, तरी पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच साधारण गणेशोत्सव संपल्यानंतर या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात होते. मोठमोठ्या शहरातून येणार्या पर्यटकांना वातानुकूलित खोल्यांमध्ये राहण्याची सवय असते. श्रीवर्धन शहरातील काही मोठी हॉटेल्स व रिसॉर्ट वगळता अन्य होम स्टे व छोट्या हॉटेल्स मालकांकडे जनरेटरची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर त्या ठिकाणी येणारे पर्यटक नाराजी व्यक्त करतात. तरी महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने या ठिकाणच्या विद्युत वाहिन्या पूर्णपणे भूमीगत करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.