आम्हाला घर कधी मिळणार; आदिवासी बांधवांचा सवाल

…अन्यथा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरातील भिसेगाव मधील आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ द्या अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत, असा इशारा कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केला आहे. आदिम जमातीचे रहिवासी असलेल्या आदिवासी बांधवांना शबरी घरकुल योजनेचा देण्याची मागणी आहे.

मागील कित्येक वर्षांपासून पिढ्यान्‌‍ पिढ्या भिसेगावमधील आदिवासीवाडी असून, ग्रामपंचायत काळापासून ते नगरपरिषद काळापर्यंत सदरील आदिवासी समाज या भागामध्ये राहात आहे. या भिसेगावातील वाडीमधील आदिवासी समाज वीटभट्टी कामगार तसेच मजूर म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्यामुळे त्यांना आजपर्यंत स्वतःचे हक्काचे भक्कम घर बांधता आले नाही. ग्रामपंचायतीची नगरपरिषद होऊन सुमारे 33 वर्षे होत आली तरी संबंधित विभागाला अथवा लोकप्रतिनिधींना आदिवासी भागात लक्ष देता आले नाही. त्यांच्या योजना राबविल्या नाही, ते सोयीसुविधांपासून वंचित राहिले आहेत. प्रत्येक गोष्ट दाद मागून घ्यावी लागते, ही नगरपरिषदेसाठी शोकांतिकेची बाब आहे. नगरपरिषदेला 33 वर्षे होत आली असूनदेखील आजवर नगरपरिषदेमध्ये या आदिवासी बांधवांच्या घराकरिता कोणतीही योजना राबवण्यात आली नाही अथवा प्रयत्न करताना दिसून आले नाही. लोकप्रतिनिधींनी फक्त टेंडरकडेच लक्ष दिले, असा आरोप यावेळी करण्यात आला. जे मतदान करतात त्यांची फक्त निवडणूक प्रसंगी आठवण येते, इतर वेळी मात्र त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही, असेही म्हटले आहे.

ग्रामपंचायतीमधील ग्रामीण भागात आदिवासी बांधवांना घरकुलाकरिता शासनाकडून निधी उपलब्ध केला जातो. नगरपरिषदेकडून हद्दीमधील या आदिवासीवाड्यांना अशा प्रकारची कोणतीही सवलत शासनाकडून मंजूर असूनदेखील राबवली जात नाही व ज्या पद्धतीने घरपट्टी अवाच्या सव्वा लावली असल्याने या आदिवासी बांधवांना शासकीय योजना तसेच शासकीय मदतच मिळत नसेल तर मतदान करण्याचा व मतदान करूनदेखील कोण दखल घेत नसेल तर आम्हाला निवडणूक नको, नेता नको, यासाठी बहिष्कार टाकतो, असे सुंदरा वाघमारे यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version