आनंदाचा शिधा मिळणार कधी?

पनवेलकरांना प्रतिक्षा

| पनवेल/खांदा | वार्ताहर |

गोरगरिबांची दिवाळी आनंदाची करता यावी यासाठी राज्यसरकारने आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दिवाळीचा सण दोन दिवसांवर आला, तरी आनंदाच्या शिध्या अभावी गरिबांच्या घरी दिवाळीचा फराळ बनलेला नाही. आनंदाचा शिधा हा सण संपल्यानंतर देणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दोन दिवसात आनंदाचा शिधा किटचे वितरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. गरिबांची दिवाळी आनंदाची होईल याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष आहे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाकडून दिवाळी शिध्याची पूर्तता करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील 200 दुकानापैकी 40 दुकानदारांना आनंदाचा शिधा किट मिळाले आहे. परंतु त्याची नोंद ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली नसल्याने ते लाभार्थ्यांना वाटू शकत नाहीत. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पनवेलमधील 2,85, 219 जनतेला या आनंद शिद्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी आनंदाची होणार आहे. त्याप्रमाणे सरकारने किट देण्याचे नियोजन केले आहे. पनवेल तालुक्यातील पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ते दिवाळी दिवसात लाभार्थीना पोहोचतील याची शाश्वती नसल्याचे चित्र आहे.
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा दिला जात आहे. मात्र तो दिवाळीनंतर मिळाल्यास त्याचा काय उपयोग होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

आनंदाचा शिधामध्ये कोणते जिन्नस
पूर्वी आनंदाचा शिधा किटमध्ये रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे 4 जिन्नस दिले जात होते. मात्र, राज्य शासनाने आता यामध्ये मैदा आणि पोहे, अशा दोन जिन्नसांचा नव्याने समावेश केला आहे. 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे देण्यात येत आहेत.

दरम्यान, 200 दुकानापैकी 40 दुकानदारांना आनंदाचा शिधा किट मिळाले आहेत. त्याची नोंद ऑनलाईन करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याचे वाटप रखडले असल्याचे पनवेल तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकान व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मागील वेळी देखील सण संपल्यावर किट प्राप्त झाले होते, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version