स्थानिकांचा ग्रामपंचायतीला सवाल
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतमधील राजमाता जिजामाता तलावातील सर्वांचे आकर्षण असलेला कारंजा गायब झाला आहे. तलावातील पाण्याच्या मध्यभागी असलेला कारंजा गेली काही दिवस दिसेनासा झाला असल्याने हा कारंजा गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
1998 मध्ये तत्कालीन सरपंच सावळाराम जाधव यांनी नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे असलेला तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यावेळ तलावातील सर्व गाळ, माती काढून तलाव खोल करण्यात आले आणि नंतर तलावाच्या मध्यभागी कारंजा बसविण्यात आला होता. राजमाता जिजामाता तलाव असे नामकरण करण्यात आलेल्या या तलावात दोन वर्षांनी खासगी व्यक्तींच्या माध्यमातून बोटिंगची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर तलावातील पाण्यात मध्यभागी असलेला कारंजा आणि त्या कारंजाचे आजूबाजूने करता येणारी पाण्यातून सैर यामुळे नेरळ गावातील हा ग्रामपंचायत तलाव नेरळकरांचे आकर्षण बनले होते.
राजमाता जिजामाता तलाव नेरळ ग्रामपंचायतीचे मानांकन बनल्याने या ठिकाणी तलावातील गाळ काढण्याचे काम आणि तलावाचे सुशोभीकरण आदी कामे करण्याची परवानगी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाकडून घेण्यात आली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेरळ ग्रामपंचायतीमधील तलावाचे सुशोभीकरण, त्यात बसण्यासाठी आकर्षक बैठक व्यवस्था, आजूबाजूला लोखंडी रेलिंग, भित्ती फलक, प्रवेशद्वारावर उभारण्यात आला आहे तर नावाची पाटी नेरळ ग्रामपंचायतीकडून लावण्यात आली. अशा राजमाता जिजामाता तलावाचे आकर्षण असलेला पाण्याच्या मध्यभागी असलेला कारंजा गेली काही दिवस दिसेनासा झाला आहे. त्यात तलावातील पाणी खाली करून कारंजा काढण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. कारंजा काढून टाकण्याबाबत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये कोणताही ठराव घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राजमाता जिजामाता तलावातील कारंजा गेला कुठे, चोरी झाला आहे काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या कारंजाबाबत नेरळ ग्रामपंचायत चोरीचा गुन्हा दाखल करणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.







