धेरंड,शहापूरमध्ये होळी पेटवायची कुठे

एमआयडीसीला ग्रामस्थांचा सवाल
| अलिबाग | प्रतिनिधी |
धेरंड,शहापूरमध्ये सतत येत असलेल्या उधाणाच्या पाण्याने गावाची पुरती वाटच लागली आहे.त्यातच आता तोंडावर आलेल्या शिमगोत्सवाची होळी पेटवायची कुठे,असा संतप्त सवालच ग्रामस्थांना पडला आहे. एमआयडीच्या बेपर्वाईने ग्रामस्थांच्या होळीवर पाणी पडल्याने सर्वस्तरातून नाराजी व्यक्त केली जात असल्याची तक्रार श्रमिक मुक्तीदलाने केलेली आहे.

धेरंड,शहापूरल काही वर्षांपासून उधाणाच्या पाण्याचा जोरदार तडाखा बसत आला आहे.नुकत्याच झालेल्या अमावस्येच्या उधाणाने परिसराची दाणादाण उडाली आहे.अनेक घरांमध्ये खारेपाणी शिरले आहे.शिवाय मालमत्ता,शेतीचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे.त्यातच आता ग्रामस्थांना चिंता पडली आहे ती शिमगोत्सवाची. अलिबाग तालुक्यात हा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.धेरंड,शहापूरमध्येही शिमगोत्सवाची धामधूम असते.पण यावर्षी पेटवायला पारंपरिक जागाच उरली नसल्याचे वास्तव श्रमिक मुक्तीदलाने प्रशासनाच्या नजरेेस आणले आहे.

मोठे शहापूर पूर्व बाजूस तसेच धाकटे शहापूर पूर्व बाजूस गेली 300 वर्षे शेतात होळी सण साजरा केला जातो. मोठे शहापूर येथे अगोदर सखाराम वि. पाटील यांचे शेतात होळी होत असे .3 वर्षापूर्वी प्रथमतः धोय व मांडलेशील भागात फुटल्याने पाणी आल्याने तेथे होणारी होळी पुढे सदानंद शंकर पाटील यांचे शेतात होत आहे. तर शहापूर येथील पूर्वापार होळी नवनाथ लक्ष्मण पाटील यांचे शेतात होत आहे.असे श्रमिक मुक्तीदलाचे राजन भगत यांनी सांगितले. 20 फेब्रुवारीला 23 रोजी खांडीमुळे सुमारे 800 एकर शेतीत पाणी घुसल्याने होळीची मैदाने देखील पाण्याखाली गेली आहेत. सर्वत्र चिखल झाला आहे. मोठे शहापूर येथील होळीचे पाटील जगदीश सखाराम पाटील व धाकटे शहापूर येथी होळीचे नंदकुमार दिनकर पाटील यांनी यावर्षी चिखलात होळी सण साजरा कसा करायचा याची चिंता व्यक्त केली आहे.

परंपरा बंद होणार
एमआयडीसीच्या बेपर्वा वृत्तीमुळे पिढ्यान्पिढ्या होणारी होळी उत्सव, आमची परंपरा, नाच, संस्कृती, नोकरदार, जुळवणे या सर्व बाबी आता लोप पावणार आहेत. त्याचबरोबर वारकरी सांप्रदायाचे सप्ताह देखील बंद होणार आहेत. अशी खंत अमरनाथ विश्‍वनाथ भगत व निवृत्त शिक्षक विनायक पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version