वीटभट्टीवरील मुलांना गोळा करू की शाळेतील मुलांना शिकवू

वावोशी दांडवाडी राजिप शाळेच्या शिक्षकाची फरफट
चार वर्गांची जबाबदारी एकाच शिक्षकावर

| वावोशी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील वावोशी ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम भागात असणार्‍या दांडवाडी आदिवासी येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी भारत आढे या एकाच शिक्षकावर खालापूर गटशिक्षणाधिकार्‍यांनी टाकली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना वीटभट्टीवर जाऊन जमवाजमव करून आणायचे की त्यांना शिकवावे, अशी दुहेरी कसरत करण्याची वेळ या शिक्षकावर आली आहे.

वावोशी दांडवाडी येथील काही आदिवासी हे रोजगारासाठी आजूबाजूच्या गावामधील वीटभट्ट्यांवर स्थलांतरित झाले असून, त्यांची मुलेदेखील त्यांच्यासोबत त्या ठिकाणी राहात आहेत. त्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता या मुलांना शाळेत नेण्यासाठी शिक्षकांना रोजच 2 ते 3 किलोमीटर अशी कसरत करावी लागत आहे. यामध्ये शिक्षकांचा बराचसा वेळ विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यातच जातो. तसेच ही शाळा दुर्गम व डोंगराळ भागात वसली असल्याने येथील शिक्षकांना पायी डोंगर चढून वर जावे लागते. त्यामुळे हे शिक्षक शाळेत पोहोचेपर्यंत या शाळेतील विद्यार्थ्यांवर लक्ष द्यायला कुणीच नसते. त्यामुळे काही विद्यार्थी नुसतेच बसून असतात, तर काही विद्यार्थी शिक्षक येईपर्यंत कंटाळून जाऊन परत घरीदेखील जातात. तर काही मुलांचा अभ्यासही बुडतो. यामध्ये शिक्षकांना पुन्हा या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांना शिकवायचे काम करावे लागते.

अशातच या शाळेत 1ली ते 4 थी असे चार वर्ग असल्याने या चारही वर्गाच्या मुलांना शिकवण्याची जबाबदारी फक्त भारत आढे या एकाच शिक्षकावर येऊन पडली असल्याने त्यांची पूर्णतः दमछाक होऊन जाते. त्यामुळे या ठिकाणी दुसरा शिक्षक असतानादेखील त्या शिक्षकाची नेमणूक इतर शाळेवर करण्यात आल्याने या सर्व वर्गांना शिकवण्याचा भार एकाच शिक्षकावर येऊन पडला आहे. त्यामुळे या ठिकाणी किमान दोन शिक्षक असणे गरजेचे आहे. सदर परिस्थितीची माहिती खालापूर पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे अधिकारी यांना वेळोवेळी देऊनदेखील या शाळेवर आधीच्या मूळ शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी याआधी असणार्‍या मूळ शिक्षकाची लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी येथील पालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे.

वावोशी दांडवाडी शाळेला दोन शिक्षकांची गरज असतानादेखील एक शिक्षक दुसर्‍या शाळेवर पाठवला आहे. त्यामुळे एकाच शिक्षकावर चार वर्गांचा भार पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी दोन शिक्षक असावेत, अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे. – रामा वाघमारे, पालक, वावोशी दांडवाडी

दांडवाडी येथील काही आदिवासी रोजगारासाठी आजूबाजूच्या गावातील वीटभट्टीवर स्थलांतरित झाले असल्याने त्या विद्यार्थ्यांची जमवाजमव करीत त्यांना शाळेत आणावे लागते. त्यानंतरच अध्यापनाचे काम करावे लागते. त्यामुळे या ठिकाणी आधीच्या मूळ शिक्षकाला पण या ठिकाणी पुन्हा रुजू केल्यास मुलांच्या शिक्षणाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देता येईल. – भारत आढे, शिक्षक, वावोशी दांडवाडी राजिप शाळा

Exit mobile version