भास्कर जाधवांचा दावा
| मुंबई | प्रतिनिधी |
आमदार अपात्रता प्रकरणावर काही तासांत निर्णय येणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी नियमांनुसार, पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार, घटनेनूसार जर निर्णय दिला तर शिंदे गटाचे आमदार 100 टक्के अपात्र होतील, असे ठाकरे गटाचे आ. भास्कर जाधव म्हणालेत.
काही चुकीचा निर्णय झाला तर देशाच्या लोकशाहीवर परिणाम करणारा निर्णय असू शकेल. भरत गोगावले नियमबाह्य आहेत. सर्व घटनात्मक पदे आता मोडीत निघाली आहेत. नियम कायदा पाळणारे हे लोक आहेत का? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय. देशाची लोकशाही आणि संविधानाचा सन्मान राखायचा असेल, सर्वोच न्यायालयाचा राखायचा असेल तर आम्ही अपात्र होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अपात्र होइल तो शिंदे गटच अपात्र होइल. हेच नियमाला धरुन असेल, असेही भास्कर जाधव म्हणाले.
आमचे आमदार अपात्र ठरण्याचा तीळमात्र कुठूनही, कायद्याने, नियमाने जरा सुद्धा संबंध नाही. पण तरीदेखील सर्व नियम आणि कायदे जर धाब्यावरच बसवायच ठरवलेय दिसतंय. एकनाथ शिंदेंना कल्पना देऊन अध्यक्ष त्यांच्या भेटीला गेले. आजपर्यत या पदावर असताना कोणीही कुठल्याही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, असे अजिबात ऐकण्यात नाही. खर तर मुख्यमंत्री अध्यक्षांना भेटायला येतात परंतू इथं अध्यक्ष स्वता भेटायला जातात, असा टोलाही भास्कर जाधवांनी लगावला.






