दुबार मतदारांचा फटका कोणाला?

चाळीस हजारांच्या आसपास मतदार जाणार गावाला

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

कामानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या अनेक मतदारांची नावे पनवेल विधानसभा क्षेत्रासोबतच आपल्या मूळ गावच्या मतदारसंघातदेखील आहेत. अशी दुबार नावे असलेले हजारो मतदार मतदानाच्या दिवशी गावी जाण्याची शक्यता असल्याने याचा फटका पनवेल विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांना बसणार आहे.

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणार असलेल्या मतदानासाठी कामाधंद्यानिमित्त नवी मुंबई, पनवेलमध्ये राहायला आलेला त्या त्या भागातील मतदार गावी जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेत मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्या त्या भागातील उमेदवारांनी आपल्या जिल्ह्यातील रहिवासी संघटनाच्या माध्यमातून नवी मुंबई, पनवेलमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यातून बोलताना आपल्या भागातील मतदारांनी गावी येऊन आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे. उमेदवारांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मतदार गावी जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांनीदेखील ही शक्यता लक्षात घेत आपल्या भागातील मतदारांना गावी नेण्या-आणण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती असून, असे झल्यास पनवेल विधानसभा क्षेत्रातदेखील नाव असलेल्या मतदारांचा कमी झालेला टक्का कोणासाठी घातक ठरणार, हे पाहावे लागणार आहे.

टक्केवारी घसरण्याची शक्यता
नवी मुंबई पनवेल परिसरात मान खटाव विधानसभा मतदारसंघातील नारिकांची संख्या मोठी आहे. या मतदारसंघातील जवळपास दहा हजार मतदार गावी जाण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल पारनेर नगर विधानसभा क्षेत्रातील पाच ते सहा हजार, सांगोला विधानसभा क्षेत्रातील चार ते साडेचार हजार, फलटण विधानसभा क्षेत्रातून अडीच ते तीन हजार, आंबेगाव आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघातील दीड ते दोन हजार, पुरंदर, भोर आणि बारामती मतदारसंघ आणि धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा विधानसभा क्षेत्रातील नवी मुंबई आणि पनवेलमधील मतदार गावी जाण्याची शक्यता असल्याने पनवेल, नवी मुंबईमधील मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता आहे.
एकच टप्प्यामुळे अडचण
पूर्वी राज्यात दोन ते तीन टप्प्यात मतदान घेतले जात होते. त्यावेळेस पनवेलमधील मतदान उरकून त्या त्या भागातील मतदार आपल्या गावी मतदानासाठी जात होते. परंतु, आता राज्यात एकाच टप्प्यात होत असल्याने मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Exit mobile version