नारायण राणे, किरण सामंत यांच्या नावाची चर्चा
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेने खा. विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, राणे यांनाच उमेदवारी मिळणार, अशी अटकळ बांधून भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या कामाला सुरुवात केली आहे.
या मतदारसंघात बेरोजगारी, रिफायनरीसह विविध प्रकल्प, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था, महागाई यांसह अनेक मुद्दे प्रचारात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा सामना राऊत यांच्याशी असेल. त्यामुळे या मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची होईल, असे सध्याचे चित्र आहे. हे दोघेही मराठा समाजाचे आहेत. आरक्षणावरून मराठा समाजात नाराजी आहे. मराठा समाजाचे काही नेते वगळता ही नाराजी कोणी थेट बोलून दाखवीत नसले तरी हा मुद्दा सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेरोजगारी आणि महागाईमुळे जनमानसांत प्रक्षोभ आहे.
जिल्ह्यात यात शाश्वत विकासाची उणीव आहे. जिल्ह्यातील आंबा बागायतदार हापूसला हमीभाव मिळावा म्हणून आग्रही आहेत तर काजूला 200 रूपये हमीभाव मिळावा म्हणून काजू बागायतदार आग्रही आहेत. या बागायतदारांच्या समस्या सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर विरोधकांनीही या दोन्ही महत्त्वपूर्ण घटकांनी अपेक्षित पाठिंबा दिलेला नाही. मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षणावरून या सर्व घटकांमध्ये नाराजी आहेच. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात 2019 मध्ये विनायक राऊत आणि डॉ.नीलेश राणे यांच्यामध्ये लढत झाली होती. राऊत यांनी शिवसेना -भाजप युतीकडून लढविली होती तर डॉ. राणे यांनी स्वाभिमान पक्षातून उभे होते. या लढतीत राऊत यांनी बाजी मारली होती.
सभा, बैठकांवर भर राऊत यांची प्रचाराची पहिली फेरी अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी आतापर्यंत खळा बैठकांवर भर दिला. नारायण राणे हेच उमेदवार गृहीत धरून ते टीका करीत आहेत. गावागावांत जाऊन त्यांनी लोकांसमोर त्यांची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे राणे यांचे नाव अजूनही निश्चित झाले नसली तरी आपल्यालाच उमेदवारी मिळणार, असा विश्वास त्यांना आहे. त्यामुळे तालुकानिहाय महत्त्वाच्या कार्यकर्त्याच्या सभा घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. राणे यांनी आतापर्यंत पाच ते सहा तालुक्यांमध्ये सभा घेतल्या आहेत. शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनीही जिल्ह्याच्या काही भागांत कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचा जो कुणी उमेदवार असेल त्याला मतदान करा, असे दोघांकडून केले जात आहेत.