उरणचा उपनगराध्यक्ष कोण?

बहुमत भाजपकडे, अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे; सत्तासंघर्ष तीव्र

| उरण | प्रतिनिधी |

उरण नगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून, नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर यांची निवड झाली आहे. मात्र, 21 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपचे 12 तर महाविकास आघाडीचे 9 नगरसेवक निवडून आल्याने नगरपालिकेतील सत्तासमीकरण वेगळेच चित्र उभे राहिले आहे. नगराध्यक्षपद महाविकास आघाडीकडे असले तरी संख्याबळ भाजपकडे असल्याने आता उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे उरण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

उरण नगरपालिकेत भाजपचे बहुमत स्पष्ट असून, भाजपकडे 12 नगरसेवक असल्यामुळे उपनगराध्यक्षपदावर भाजपाचाच नगरसेवक बसण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. भाजपकडून उपनगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष रवी भोईर यांच्या नावाची चर्चा सुरू असली, तरी त्यांच्या नावाला पक्षातीलच काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले असून, काही पदाधिकारी नव्या व नवनिर्वाचित नगरसेवकाला उपनगराध्यक्षपद देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

एकीकडे भाजपचे संख्याबळ, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपद आणि थेट राजकीय आव्हान, अशा परिस्थितीत उरण नगरपालिकेतील उपनगराध्यक्षपदाची लढत अधिकच रंगतदार बनली आहे. भाजप पक्षांतर्गत एकी टिकवतो की महाविकास आघाडी राजकीय खेळी करून धक्का देते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उरण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अखेर कोणाची वर्णी लागते, याकडे उरणच्या जनतेचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version