मावळचा सुभेदार कोण?

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदान शांततेत पार पडले. सकाळी सात वाजल्यापसून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे 52.30 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीत 59 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत यंदादेखील घसरण झाल्याचे दिसून आले आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासह 33 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. मतमोजणी चार जूनला पुणे येथील बालेवाडीमधील श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलातील वेट लिफ्टींग हॉलमध्ये होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

गेल्या महिन्याभरापासून मतदारसंघात प्रचार करण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सभा झाल्या. शनिवारी 11 मे रोजी प्रचार थांबले. त्यानंतर सोमवारी 13 मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी या सहा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली.

काही मतदारांनी विकासकामे न झाल्याने मतदान करण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मतदान आपले कर्तव्य आहे, हे ओळखून मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी सरसावले. दुपारी उन्हामुळे काही मतदार मतदान करण्यासाठी गेले नाही, तर काही मतदार उन्हाचा चटका बसत असतानादेखील मतदान करण्यासाठी केंद्रावर रांगेत उभे असल्याचे दिसून आले. दुपारनंतर मतदान करण्यासाठी पुढे आलेल्या मतदारांना अवकाळी पावसाची अडकाठी आली. मात्र, पाऊस थांबल्याने पुन्हा वेगळ्या उमेदीने मतदार मतदान करण्यासाठी पुढे आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 46.3 टक्के मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 51 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

पनवेल विधानसभा मतदारसंघातील 544 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांमध्ये पाच टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सुरुवातीला मतदानाला फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र, सकाळी नऊनंतर मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 52.30 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील 339 मतदान केंद्रांवर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झाले. सकाळी सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, दुपारनंतर मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. काही काळ अवकाळीने हजेरी लावल्याने मतदारांचा खोळंबा झाला. सायंकाळी सहावाजेपर्यंत सुमारे 56 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मतदार यंत्रांमध्ये बदल
सकाळी मतदानापूर्वी झालेल्या मॉकपोलवेळी 25 बॅलेट युनिट, 6 कंट्रोल युनिट आणि 14 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. यामध्ये पनवेल (1 बीयु, 3 व्हीव्हीपॅट), कर्जत (3 बीयु, 2 व्हीव्हीपॅट), उरण (6 बीयु, 2 व्हीव्हीपॅट), मावळ (3 बीयु, 1 सीयु, 4 व्हीव्हीपॅट), चिंचवड (9 बीयु, 3 सीयु, 2 व्हीव्हीपॅट), पिंपरी (3 बीयु, 2 सीयु, 1 व्हीव्हीपॅट) मतदान यंत्रांचा समावेश होता. मतदान प्रक्रिया सुरू असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघात 12 बीयु, 4 सीयु आणि 7 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. तर पनवेलमध्ये 4 व्हीव्हीपॅट, कर्जतमध्ये 6 व्हीव्हीपॅट, उरणमध्ये 2 व्हीव्हीपॅट, मावळ 6 व्हीव्हीपॅट आणि पिंपरी 2 व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले.
Exit mobile version