प्रस्थापितांना गाफील ठेवून धक्का देणार
। माथेरान । वार्ताहर ।
विधानसभेच्या निवडणुकांचा ज्वर आता हळूहळू जोर धरू लागला असून माथेरानमध्येही त्याचे वारे फिरू लागले आहेत. परंतु, यावेळी माथेरानकर कोणाला साथ देणार, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात असून यावेळी सर्वच उमेदवारांनी माथेरानकरांना आश्वासने दिली असली तरी, या निवडणुकीत प्रस्थापितांना गाफील ठेवून धक्का देणार, हे मात्र निश्चित आहे.
विधानसभेच्या निमित्ताने हळूहळू निवडणुकांचे रंग आता भरू लागले आहेत. यानंतर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागणार असल्याने काही काळ भूमिगत झालेले स्वयंघोषित नेते आता हळूहळू दिसू लागले आहेत. यास माथेरानही अपवाद नसून मागील दोन वर्षांपासून भूमिगत झालेल्या काही नेत्यांची आता दर्शने होऊ लागल्याने निवडणुका जवळ आल्या असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले आहे. माथेरान नगरपालिकेचे सभागृह विसर्जित होऊन आता दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. या काळात अनेक इच्छुक उमेदवारांचे मतदारांसोबत थेट संबंध येत होते. परंतु, निवडणुका पुढे ढकलल्यानंतर ही सर्व मंडळी गायब झाली होती. यातील काही अपवाद वगळता स्वयंघोषित नेते भूमिगत झाले होते. परंतु, आता लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण मतदारांचे कैवारी आहोत हे दाखविण्याकरता काही जणांची धडपड सुरू झाल्याचे सध्या पहावयास मिळत आहे.
माथेरानमध्ये महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असून त्याचा थेट पाठपुरावा करण्यास सर्वच राजकीय पक्ष अपुरे पडले आहेत. माथेरानसाठी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पर्यायी रस्ता व येथील वाहनस्थळ विकसित करणे, ज्याकडे या दोन वर्षांमध्ये लक्ष दिले गेले नसल्याचे दिसत आहे. स्थानिक तालुका पातळीवरील नेतृत्व व त्यांचे समर्थक मतांच्या राजकारणाकरिता तसेच काही बाहेरील लोकांचे हित जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक या महत्त्वाच्या विषयांना बगल देत तर नाहीत ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे माथेरानकर अगामी विधानसभेच्या निवडणूकीत प्रस्थापितांना मोठा धक्का देणार हे निश्चित.