| माथेरान | प्रतिनिधी |
पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी वनविभाग माथेरान यांच्या वनसमितीची निवड नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाकडून दर पाच वर्षांनी करण्यात येते. परंतु, नगरपरिषदेच्या निवडणुकीला पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी गेल्यामुळे या समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. वनसमितीला वाहन पार्किंगच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत असते. माथेरान मधील जवळपास अधिक क्षेत्र हे वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी खर्च करण्यासाठी ही समिती सहकार्य करीत असते.
नुकताच नगरपरिषदेची निवडणूक पार पडली असून महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे वनसमितीची नव्याने निवड व्हावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली असून अनेकजण या समितीवर काम करण्यासाठी इच्छुक दिसत आहेत. मागील काळात या समितीने आपल्या परीने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. नव्याने या समितीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या मंडळींना येथील पर्यावरण त्याचप्रमाणे स्वच्छता राखण्यासाठी प्लास्टिक मुक्त माथेरान असावे, तसेच या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना अभिप्रेत असणारे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी मेहनत करणाऱ्या सदस्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाने या समितीच्या कार्यकारिणी वरील सर्वच सदस्यांची निवड करताना जे खरोखरच आत्मीयतेने कामे करू शकतात अशांना संधी उपलब्ध करुन दिल्यास माथेरान हे स्वच्छ, हरित आणि पर्यटन वाढीस मदत होईल असेही सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.






