सुरेश लाड यांचा राजीनामा मंजूर; खा. सुनील तटकरे यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी राजीनामा दिला होता. याबाबत शनिवारी (दि. 30) झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकित माजी आ. सुरेश लाड यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून पक्षश्रेष्ठी आता जिल्हाध्यक्षाची जबाबदारी कोणाकडे देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. येत्या आठ दिवसांत नवीन जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणार असल्याचेही यावेळी तटकरे यांनी सांगितले.
माजी आ. सुरेश लाड यांचा राजीनामा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी दिली. मात्र यापुढे सुरेश लाड पक्षातच राहणार असून त्यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी देण्यात येणार असल्याचेही यावेळी तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे सुरेश लाड यांचा रुसवा दूर करण्यात तटकरे यांना यश आले आहे. वरसोली येथील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला खा. सुनील तटकरे यांच्यासह सुरेश लाड, कार्याध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा उमा मुंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अपेक्षा कारेकर आदी उपस्थित होते.