कोण होणार विश्‍वविजेता? रविवारी मेलबर्नमध्ये फैसला

इंग्लंड -पाक लढतीवर पावसाचे सावट

| मेलबर्न | वृत्तसंस्था |

विश्‍वकरंडकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. 44 लढतींच्या धुमश्‍चक्रीनंतर आता स्पर्धेला जेता ठरणार आहे. इंग्लंड – पाकिस्तान या दोन माजी विजेत्यांमध्ये अजिंक्यपदाची लढत रविवारी (दि.13) होणार आहे. या लढतीकडे अवध्या क्रिकेटविश्‍वाचे लक्ष लागले आहे.

रविवारी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर राखीव दिवस असलेल्या सोमवारीही वरुणराजाचे आगमन होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दोन्ही दिवस पाऊस पडला आणि लढत खेळवण्यात आली नाही, तर दोन्ही संघांना जेतेपद विभागून देण्यात येणार आहे.
इंग्लंडच्या संघाने टी-20 विश्‍वकरंडकाआधी पाकिस्तानवर 4-3 असा टी-20 मालिका विजय संपादन केला होता. तसेच गतविजेत्या ऑस्ट्रेलियालाही 2-0 अशी धूळ चारली होती. या दोन्ही मालिका इंग्लंडने पाकिस्तान व ऑस्ट्रेलियामध्ये जिंकल्या होत्या. त्यामुळे आता जॉस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ टी-20 विश्‍वकरंडक जिंकण्याची स्वप्न पाहत असेल यात शंका नाही. दरम्यान, टी-20 विश्‍वकरंडकाआधी पाकने न्यूझीलंडमधील तिरंगी टी-20 मालिका जिंकण्याची किमया करून दाखवली होती.

प्रत्येकी दहा षटकांचा खेळ अनिवार्य
आयसीसीकडून बाद फेरीसाठी नियमात बदल करण्यात आले आहेत. साखळी फेरीत दोन्ही संघांनी किमान पाच षटके खेळली की सामन्याचा निकाल निश्‍चित होत असे; पण आता दोन्ही संघांनी प्रत्येकी 10 षटके खेळणे अनिवार्य असणार आहे. एका संघाने दहा षटके फलंदाजी केली, पण दुसर्‍या संघाने दहा षटके खेळण्याआधी पाऊस आला. त्यानंतर खेळच होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना जेतेपद विभागून दिले जाईल. तसेच अंतिम फेरीच्या लढतीला रविवारी सुरुवात झाली; पण काही काळानंतर या लढतीत पावसाचा व्यत्यय आला. अशा परिस्थितीत उर्वरित लढत सोमवारी खेळवण्यात येईल. सोमवारीही पावसाच्या व्यत्ययाने खेळ पूर्ण होऊ शकला नाही, तर अजिंक्यपदाची विभागणी करण्यात येईल. टी-20 विश्‍वकरंडकाच्या जेतेपदाच्या लढतीत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली आहे. या स्पर्धेची अंतिम लढत होऊन स्पर्धेला जेता मिळावा, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version