10 अन्न आणि औषध निरीक्षकांची पदे रिक्त; दोन निरीक्षकांवर निवडणुकीची जबाबदारी
। रायगड । प्रतिनिधी ।
सणासुदीच्या काळात मिठाई व इतर खाद्यपदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते, मात्र काही विक्रेते भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करून लोकांच्या जीवाशी खेळतात. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारचा खास विभाग कार्यरत आहे. मिठाई तयार करणार्या कारखान्यांसह किरकोळ विक्री करणार्या दुकानांची तपासणी करण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर असते; परंतु रायगड जिल्ह्यात दोन्ही निरीक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीदरम्यान मिठाई व खाद्यपदार्थांमधून होणारी भेसळ कोण रोखणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
15 तालुक्यांसाठी 12 अन्न आणि औषध निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. यातील फक्त दोनच पदे भरली असून उर्वरित 10 पदे रिक्त आहेत. त्यामुळे दोन निरीक्षकांवर कामाचा अतिक्ति ताण पडतो आहे. दिवाळीत या निरीक्षकांच्या जबाबदारीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणात होणारी भेसळ रोखण्याबरोबरच अन्न आणि औषध निरीक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपण्यात आले आहे. त्यामुळे औषधांचे नमुने घेणे, वैद्यकीय दुकानांची तपासणी, खाद्यपदार्थ तयार करणार्या कंपन्यांच्या पदार्थांची तपासणी करणे अशीही कामे त्यांना करावी लागणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी केलेल्या तक्रारींचीही शहानिशा करण्याची जबाबदारीही दोन निरीक्षकांवर आहे. निवडणुकीच्या कामात हे निरीक्षक आपल्या जबाबदारीकडे किती लक्ष देतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सणासुदीच्या काळात मिठाई व इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. रायगड जिल्ह्यात हे प्रमाण खूप जास्त आहे. काही व्यावसायिकांकडून भेसळयुक्त अन्नपदार्थ विकण्याची साखळी निर्माण करण्यात आली आहे. ही साखळी सणासुदीच्या दिवसांत अधिक सक्रिय होते. यंदाच्या दिवाळीत अशा भेसळ करणार्यांसाठी रान मोकळे झाले आहे. काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करतात. यंदाही दिवाळीनिमित्त भेसळयुक्त मिठाई व खाद्यपदार्थांमधील भेसळ वाढण्याची शक्यता आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून सणापूर्वी छापे मारून भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणार्यांवर कारवाई केली जाते, मात्र प्रशासनाची ही कारवाई अपुरी पडते, पुन्हा ही साखळी सक्रिय होत असल्याने दिसून येत आहे.
जिल्ह्यातील भेसळ रोखण्यासाठी 12 पदे मंजूर आहेत. यातील दोनच पदे भरली असून त्यांच्यावरही निवडणूक कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही तालुके दुर्गम असल्याने तेथे जाणे-येणे जिकरीचे होते. त्यामुळे दिवाळीतील भेसळ रोखण्याच्या मोहिमेत थोडीशी बाधा येऊ शकते.
मारुती घोसाळवाड,
सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, पेण







