सोमनाथ ओझर्डे यांचा राज्य सरकारला सवाल
| महाड | प्रतिनिधी |
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शाही मेजवानीसाठी रायगडचे खासदार सुनील दत्तात्रय तटकरे यांच्या रोह्यातील सुतारवाडी खासगी जमिनीत उभारण्यात आलेल्या हेलिपॅडसाठी दीड कोटीचा खर्च झाला, तो कोणाच्या खिशातून वसूल करणार, असा सवाल महाड तालुक्यातल्या शिरगाव ग्रामपंचायत सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी राज्य शासनाला विचारला आहे.
सुतारवाडीत घाई घाईने हेलिपॅड बनवण्याचे काम ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी केले, त्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मी निवेदनाद्वारे केलीच आहे. आमच्या पक्षाच्या वतीने केलेल्या तक्रारीमुळेच हेलिपॅडच्या कामाची निविदा रद्दबातल केली आहे, हे आमच्या पक्षाचे यश आहे. मात्र, संबंधित दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी शुक्रवारी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
शेठ, थापा मारणं बंद करा!
मंत्री भरत गोगावले यांनी आता थापा मारणं बंद करून विकासकामांवर भर दिला पाहिजे असा खोचक सल्ला दिला. जनतेचे अनेक प्रश्न आहेत, गरिबांचे शेठ आहात तर गरिबांच्या कामांकडे लक्ष द्या असे सांगून मुंबईत करोडो रुपयांचे फ्लॅट आणि बंगले आले कुठून याचाही समाचार एक दिवशी घेतला जाईल, असा इशारा सोमनाथ ओझर्डे यांनी दिला. आजही महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिवंत आहे. येणार्या काळामध्ये अनेक मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून आवाज उठवला जाईल, असेही ओझर्डे म्हणाले.
पालकमंत्री पद गोगावलेना मिळणार?
महाड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत विजय झाल्यानंतर आमदार गोगावले यांना कोणताही विरोधक राहिला नाही, असा त्यांचा गैरसमज आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जे चुकीचे आहे ते बोलण्यासाठी आम्ही नेहमीच त्यांच्या विरोधात उभे राहू चार वेळा निवडणुकीत विजयी झाले, मंत्री झाले, आता त्यांना पालकमंत्रीपद मिळण्यासाठी ते धडपड करीत आहेत. मात्र, जर त्यांना पालकमंत्री करायचे तर पहिल्याच टर्ममध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना पालकमंत्री केले असते, त्यामुळे त्यांना आता पालकमंत्री करतील की नाही याबाबत ओझर्डे यांनी शंका व्यक्त केली.
जलजीवन योजना आणल्या, मात्र पाणीटंचाई कायम
महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलजीवन नळ पाणीपुरवठा योजना आणल्या. मात्र, तरीदेखील गावेवाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. जर जलजीवन मिशन योजनेंतर्गत तालुक्यात निधी आणला, तर तो निधी गेला कुठे, विकासकामे केली तर जागेवर का दिसत नाहीत, असा सवाल ओझर्डे यांनी केला आहे.