| उरण | प्रतिनिधी |
उरण नगर परिषदेची 10 प्रभागावरील सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया मंगळवारी (दि.2) 29 बुथवर पार पडली. यावेळी सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर आपली हजेरी लावून आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार झाल्याच्या घटना घडल्या. उरणच्या आजी-माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे मत मोजणीच्या दिवशी कोण गुलाल उधळणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकूण 26 हजार 214 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवार उभे असून, 21 नगरसेवकपदासाठी 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून भावना घाणेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाने रुपाली ठाकूर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली असून भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी शोभा कोळी-शहा यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, नगराध्यक्षपदासाठी खरी लढत ही महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवार यांच्यात होणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मतदानाच्या दिवशी मंगळवारी काही मतदार केंद्रावर बाचाबाचीचे प्रकार घडले आहेत. उरणच्या दहा प्रभागांची एकूण मतदार संख्या 26,214 आहे. त्यातील 17,805 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 67.92 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथौरण तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली.
मतदान प्रक्रिये दरम्यान, महाविकास आघाडीकडून खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शेकापचे तालुका चिटणीस रवि घरत यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन पोलीस यंत्रणेला शांततेत मतदान प्रक्रिया पार पडण्याचे सुचित करण्यात आले. मिळालेल्या रिपोर्टनुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 75 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून 21 डिसेंबरला निकालाच्या दिवशी गुलाल कोण उधळणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.






