प्रतिष्ठेच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत यंदा कोणाची बाजी?

विदित, प्रज्ञानंद, गुकेश, हम्पी, वैशाली यांचे सर्वस्व पणाला

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

बुद्धिबळातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आवाहनवीरांच्या स्पर्धेला 3 एप्रिलपासून कॅनडा येथील टोरंटो येथे प्रारंभ होणार आहे. यंदाची स्पर्धा भारतासाठी खूपच खास ठरणार आहे. प्रथमच एकापेक्षा अधिक भारतीय बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभाग नोंदवतील. खुल्या विभागातील आठपैकी तीन, तर महिला विभागातील आठपैकी दोन बुद्धिबळपटू भारतीय असतील. त्यामुळे भारतीय बुद्धिबळाची सामर्थ्य दाखवणारी अशी ही स्पर्धा ठरू शकेल.

बुद्धिबळातील अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा
'कॅन्डिडेट्स' स्पर्धेतील विजेत्या बुद्धिबळपटूला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सध्याच्या जगज्जेत्याला आवाहन देण्याची संधी मिळते. सध्या पुरुषांमध्ये डिंग लिरेन आणि महिलांमध्ये जू वेन्जून हे चीनचे बुद्धिबळपटू जगज्जेते आहेत. या दोघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळवण्यासाठी 'कॅन्डिडेट्स' स्पर्धेत पुरुष आणि महिला विभागात प्रत्येकी आठ बुद्धिबळपटू आपले सर्वस्व पणाला लावतील.
'कॅन्डिडेट्स' स्पर्धेचे स्वरूप
'कॅन्डिडेट्स' स्पर्धा 3 ते 22 एप्रिल या कालावधीत टोरंटोतील 'द ग्रेट हॉल' या ठिकाणी खेळवली जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच खुल्या आणि महिला विभागातील सामने एकाच ठिकाणी होणार आहेत. 3 एप्रिलला स्पर्धा सुरू होणार असली, तरी पहिल्या दिवशी केवळ उद्घाटन समारंभ असेल. 4 एप्रिलपासून सामन्यांना सुरुवात होईल. खुल्या विभागातील आठ बुद्धिबळपटू एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन असे एकूण 14 डाव खेळतील. प्रत्येक बुद्धिबळपटूला अन्य सात बुद्धिबळपटूंविरुद्ध एकदा पांढर्‍या मोहर्‍यांनी आणि एकदा काळ्या मोहर्‍यांनी खेळण्याची संधी मिळेल. महिला विभागातील स्पर्धाही अशाच पद्धतीने खेळवली जाईल. चौथ्या, सातव्या, दहाव्या आणि बाराव्या फेरीनंतर विश्रांतीचा दिवस असेल. चौदाव्या फेर्‍यांअंती सर्वाधिक गुण असलेला बुद्धिबळपटू विजेता ठरेल. मात्र, पहिल्या स्थानासाठी दोन बुद्धिबळपटूंमध्ये बरोबरी असल्यास चौदाव्या फेरीनंतर 'टायब्रेकर' खेळवला जाईल. यात बाजी मारणारा बुद्धिबळपटू जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीसाठी पात्र ठरेल.
भारताचे बुद्धिबळपटू
पाच वेळच्या जगज्जेत्या विश्‍वनाथन आनंदच्या आधी किंवा नंतर भारतीय बुद्धिबळपटू 'कॅन्डिडेट्स'साठी पात्र ठरू शकले नव्हते. यंदा मात्र एकाच वेळी तब्बल पाच भारतीय बुद्धिबळपटूंना 'कॅन्डिडेट्स'मध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. खुल्या विभागात विदित गुजराथी (29), आर. प्रज्ञानंद (18), आणि डी. गुकेश (17). तर, महिलांमध्ये कोनेरू हम्पी (36) आणि आर. वैशाली (22) असे विक्रमी पाच भारतीय ग्रँडमास्टर यंदा 'कॅन्डिडेट्स'मध्ये खेळताना दिसतील. भारतीय बुद्धिबळाने गेल्या काही वर्षांत झपाट्याने प्रगती केली आहे.

आता या पाच जणांपैकी कोणाला ‘कॅन्डिडेट्स’ जिंकण्यात यश आल्यास भारतीय बुद्धिबळाचे वर्चस्व अधोरेखित होईल.

Exit mobile version