रायगडमध्ये विजयी गुलाल कोणाचा?

अनंत गीते की तटकरे?

| रायगड | खास प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. काही टीव्ही चॅनलने त्यांच्या एक्झीटपोलमध्ये भाजपाला झुकते माप देऊन टाकले आहे. मात्र, वस्तुस्थिती फारच निराळी असून, इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याचे बोलले जाते. रायगड लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीतील शिवसेनेचे (ठाकरे गट) अनंत गीते आणि महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सुनील तटकरे यांच्या समर्थकांनी विजयी गुलाल उधळण्याची तयारी केली आहे. अनंत गीते यांचेच पारडे अधिक जड राहण्याची जास्त शक्यता असल्याने इंडिया आघाडीमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

यंदाची लोकसभा निवडणूक राज्यात पाच टप्प्यांत झाली. पहिल्या टप्प्यापासून मतदानाची टक्केवारी पाहून सारेच हबकून गेले होते. त्याचा सर्वाधिक धसका भाजपाने घेतला होता. निवडणूक ज्या मुद्द्यांभोवती फिरेल, असे सत्ताधार्‍यांना वाटत होते, तसे झाले नाही. मतदानाचा टप्पा जसजसा पुढे सरकरत गेला, तसतशी ही निवडणूक लोकांनीच कधी हाती घेतली, हे सत्ताधार्‍यांना उमगलेच नाही. राष्ट्रीय मुद्द्यावर केंद्रित होणे अपेक्षित असताना प्रथमच ही निवडणूक मोठ्या प्रमाणावर स्थानिक मुद्द्यांवर केंद्रित झाली आणि तेथूनच सत्ताधार्‍यांची समीकरणे चुकत गेल्याचे स्पष्ट दिसले.

अनंत गीते यांच्यासाठी दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे, शरद पवार, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते मैदानात उतरले होते. भाजपाने ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा राग सर्वसामान्य मतदारांमध्ये कमालीचा होता. त्यांच्या सहानभुतीचा फायदा गीतेंना झाला नाही, तर नवलच म्हणावे लागेल. तसेच ओबीसी, मराठा आरक्षण मुद्द्यांवर या समाजाची नाराजी, मुस्लिम समाजाची नाराजी, संविधान बदलण्याच्या भूमिकेमुळे दलित समाजाच्या नाराजीचा फटका तटकरेंना बसणार, असे वातावरण दिसून आले होते. तटकरेंसाठी भाजपासारखा पैशाने बलाढ्य असलेला पक्ष मैदानात होता, तसेच स्वतःच्या आर्थिक सुबत्तेमुळे तटकरे हे सक्षम असल्याचे दिसले. त्यांना महायुतीतील विद्यमान आमदारांची सोबत होती.

लोकसभेच्या निवडणुकीत प्रामुख्याने विधानसभा मतदारसंघनिहाय कुणाला किती आघाडी मिळाली, यावर त्या भागातील विद्यमान आमदारांचा प्रभाव निश्‍चित होतो. युती अथवा आघाडीच्या संबंधित उमेदवारास किती मते मिळवून दिली, याचेही परीक्षण या निकालावेळी होणार आहे. काही आमदारच खासगीमध्ये कोण येणार अशी विचारणा करत असतील तर, निकाल काय लागणार हे समजण्यास सोपे आहे. निकाल लोकसभेचा असला तरी विद्यमान आमदार भरत गोगावले, आमदार रवींद्र पाटील, योगेश कदम तसेच अलिबागच्या आमदारांमध्ये कमालीची अस्वस्था वाढल्याची चर्चा आहे. त्यांच्या उमेदवारांचा निकाल विरोधात गेल्यास या सर्वांचाच निकाल लागणार एवढे मात्र निश्‍चित आहे. काहींच्या मते, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील समीकरणं वेगळी असू शकतात. त्यामुळे थेट असा निकष लावणे घाईघाईचे ठरेल. परंतु, असे असले तरी या निवडणुकीतील मतांच्या संख्येवर पुढील गणिते मांडली जाणार आहेत. दरम्यान, कोण विजयी होणार आणि कोण हरणार याची हे काही अवधीतच निकाल लागल्यावर स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत सर्वांचीची उत्सुकता ताणली गेली आहे.

नेहुली क्रीडा संकुल येथे मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झालू असून, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Exit mobile version