अलिबागमधील 2 हजार नागरिकांना तहसीलदारांनी का दिली नोटीस

| अलिबाग | प्रतिनिधी |
गुरचरण जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी अलिबाग तहसील कार्यालयाकडून नोटीसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे दोन हजार नागरिकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. तहसीलदारांच्या नोटीसांनी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून गुरचरण जागेत बांधलेली घरे मोडणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये गुरचरण जागेमध्ये अतिक्रमण करण्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. काहींनी अतिक्रमण जागेमध्ये घरे बांधली आहेत. काहींनी गोठे तर काहींनी वेगवेगळ्या प्रकारचे बांधकाम करून अतिक्रमण केले आहे.

गुरचरण जागेमध्ये अतिक्रमण वाढल्याने महसूल विभागाने आता कारवाईचा बडगा सुरु केला आहे. अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी गेल्या महिन्याभरापासून कारवाई सुरू केली आहे. गुरचरण जागेत अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीसा देण्याचे काम सध्या सुरु आहे. आतापर्यंत दोन हजार नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. महसूल विभागाकडून आलेल्या नोटीसीनंतर नागरिकांची धावाधाव सुरु झाली आहे.

काहीजण वकीलांना भेटत आहेत, तर काहीजण तहसील कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांना भेटून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुरचरण जागेत काहींनी घरे बांधल्याने आपले घर मोडले जाईल, अशी भिती अनेकांमध्ये निर्माण झाली आहे.

अलिबाग तालुक्यातील दोन हजार नागरिकांना आतापर्यंत गुरचरण जागेमध्ये अतिक्रमण केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. शासनाचे जसे आदेश येतील त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

विक्रम पाटील – तहसीलदार अलिबाग
Exit mobile version