परिवहन मंडळ झोपलंय?आंबेत बसस्थानकाकडे का होतंय दुर्लक्ष

। आंबेत । प्रतिनिधी ।
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्य मंत्री होऊन गेलेले बॅ. ए. आर अंतुले यांचे मूळ गाव समजल्या जाणार्‍या आंबेत येथील बसस्थानकाची खूप मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून येथील सुखसोयींची देखील मोठ्या प्रमाणात वानवा जाणवत आहे.

देशाच्या राजकारणात तसेच महाराष्ट्रातील समाजकारणात ज्यांनी आपला ठसा कायम उमटविला, अशा नेत्याच्या गावाकडे आज प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक करीत आहेत. 1980 च्या दशकात अंतुले यांनी आंबेत या अतिदुर्गम भागात एसटी निवारा शेड, बसस्थानक,आरोग्य दवाखाने, सावित्री नदीवरील पूल, राज्यमार्गांना जोडणारे रस्ते, संदेरी धरण अशा अनेक विकासकामांतून जनतेचे प्रश्‍न मार्गी लावले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड अशा तीन तालुक्यांना जोडताना आंबेत येथे भल्या मोठ्या बसस्थानकाची उभारणी केली. परंतु आजतागायत या बसस्थानकाला पडक्या वाड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथे असणारे वाहतूक नियंत्रण कक्ष, सार्वजनिक शैचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपहारगृह सद्यस्थितीत धूळखात पडले आहे.

स्थानकावरील पत्र्याची शेड निसर्ग चक्री वादळात पडली आहे. आज या गोष्टीला वर्ष उलटून गेले तरी कोणत्याही कामाची पाहणी अथवा दुरुस्ती न करण्यात आल्याने हे बसस्थानक आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आगामी काळात हे बसस्थानक लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावे, अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Exit mobile version