कशाला हवेत अधिकृत बार, येथे सगळीच दारू मिळते यार..!

। पेण । प्रतिनिधी ।

कशाला हवेत अधिकृत बार? येथे सगळीच दारू मिळते यार..! असं म्हणण्याची वेळ आता तळीरामांवर आल्याने ऐन गणेशोत्सवातही मद्याची जोरदार विक्री सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

पेण तालुका तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दित विभागला असून यामध्ये पेण शहर पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे, आणि वडखळ पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. परंतु तीनही पोलीस ठाण्यांचा विचार करता मनुष्यबळाची वानवा आहे. ज्याप्रमाणे कर्मचारी हवेत त्या प्रमाणात कर्मचारी नाहीत. त्यामुळे कार्यरत असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना 24-24 तास ड्युटी करावी लागते. सणासुदीच्या वेळेला तर 2-2 दिवस पोलीस कर्मचारी घराचे तोंडदेखील बघत नाहीत. त्यातच पेण तालुक्यामध्ये चायनीज सेंटरचा सुळसुळाट वाढला आहे. त्याकडे अन्न व औषध प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे.

उत्पादन शुल्क विभागाने पेणला जणू काही वार्‍यावरच सोडले आहे. गेल्या दिड वर्षात पेण तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाची एकही कारवाई नाही. त्यामुळे पेण तालुक्याच्या चायनीज सेंटर वर सर्रास दारू विक्री केली जाते. त्यामुळे कुठेही, कधीही, कोणतीही दारू सहजतेने उपलब्ध होत आहे. त्यामुळे काही जण विनोदाने असे ही म्हणतात की, यार कशाला हवेत अधिकृत बार? येथे सगळीकडेच दारू मिळते यार ..! जणू काही दारू विक्रीसाठी परवानाधारक दुकानाची गरज नाही. पैसे जास्त दिले की, कोणत्याही चायनिज सेंटरवर अथवा ढाब्यावर सहजगत्या दारू उपलब्ध होत आहे.

गणपती उत्सवाच्या काळात दारूमुळे शांतता व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस खाते प्रयत्न करतात. परंतू, चायनिज सेंटरला परवानगी ही पोलीस खात्याच्या मर्जीने दिली जात नाही. ती दिली जाते चायनीज सेंटरवर मिळणार्‍या अन्न पदाथार्ंचे बारा वाजलेले असतातच. परंतु त्या ठिकाणी दारू उपलब्ध होत असल्याने आंबट शौकीन ग्रुपगु्रपने जमा होत असतात. अवैध दारू विक्री विरूध्द कारवाई करण्याचे काम हे उत्पादन शुल्क विभागाचे आहे. परंतु या विभागाच्या कारवाया नसल्याच्या बरोबरच आहेत. त्यामुळे सर्रास दारू विक्री चायनिज सेंटर व ढाब्यांवर होत असल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळते. ज्यांनी प्रतिबंध करायला पाहिजे ते दुर्लक्ष करतात. मात्र, सर्व बिल खाकीवर फाडले जातात एवढे नक्की. त्यामुळे नजीकच्या काळात जर अवैध्य दारू विक्रीला आळा घातला नाही तर अधिकृत बारांपेक्षा अनधिकृतच दारू विक्रीचा सुळसुळाट होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version