| पुणे | वृत्तसंस्था |
पनामा गैरव्यवहारात देशातील अनेक प्रसिद्ध उद्योगपतींची नावे समोर आली होती. काळ्या पैशांच्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे मोदी सरकारकडे उपलब्ध आहेत. कागदपत्रे उपलब्ध असताना कोणतीही कारवाई का केली गेली नाही, असा सवाल करत कारवाई करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्येही तोडपाणी केली, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी हा आरोप केला. या वेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, रमेश बागवे, अभय छाजेड, यांच्यासह शहरातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. चव्हाण यांनी या वेळी गेल्या दहा वर्षांतील मोदी सरकारच्या काळातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ”मोदींच्या 10 वर्षांत किती विकास झाला आणि किती अधोगती झाली, 2014 च्या निवडणुकीत त्यांनी दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली, याची तुलना झाली पाहिजे. मागे दिलेली आश्वासने का पूर्ण झाली नाही, यावर मोदींनी खुलासा केला पाहिजे. मागील आश्वासने पूर्ण झाली नाहीत, मग आता दिलेली आश्वासने कशी पूर्ण करणार. अर्थव्यवस्थेचा विकास मंदावलेला असून, आर्थिक, नैतिक गैरव्यवहार सुरू आहेत.”
केंद्र सरकारकडून शेतकर्यांवर अन्याय शेतकर्यांच्या जीवनात मोदी सरकारने विष कालवले असून, कुणाशी चर्चा न करता मोदी सरकारने शेतीविषयक कायदे केले. मात्र हे कायदे शेतकर्यांच्या रेट्यामुळे मागे घ्यावे लागले. त्यामुळे मोदी सरकारचा अपमान झाला आहे. कांदा, गहू, तांदुळ निर्यातबंदी करून मोदी सरकार त्याचा सूड शेतकर्यांवर उगवत आहे,असा आरोपही चव्हाण यांनी केला.
भाजपकडून वंचितसारखा प्रयोग मतांच्या विभाजनासाठी भाजपकडून वंचितसारखा प्रयोग करण्यात आला आहे, असा आरोपही चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केला. जनतेला आता हे कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांमुळे फारसा फरक पडणार नाही, असेही चव्हाण म्हणाले. महाविकास आघाडीला या निवडणुकीत चांगले यश मिळेल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.