निकृष्ट धान्याची लॅबमध्ये तपासणी का?

। पेण । प्रतिनिधी ।

जिल्हयातील मध्यांन भोजन आहार विभाग कृषीवलच्या बातमीने खडबडून जागा येऊन कामाला लागला आहे. दोन दिवसांपूर्वी गटशिक्षण अधिकारी अरूणादेवी मोरे व जिल्हा पोषण आहार अधिक्षक राजेंद्र गायकवाड यांनी काही शाळांचे धान्य तपासले होते. यानंतर तालुका स्तरावर सर्व मुख्याध्यापकांची बैठक पेण शहरात बोलवण्यात आली होती. त्यांच्याकडून धान्यांचे नमुने मागविण्यात आले व हे सर्व नमुने कोकण भवन येथील लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठविले अहेत. परंतु, धान्य एवढया निकृष्ट दर्जाचे आहे की ते डोळयांनी दिसत असूनही अधिकारी वर्ग कागदी घोडे का नाचवत आहेत, हा मोठा संशोधनाचा विषय आहे.

या विषयी जिल्हा पोषण आहार अधिक्षक राजेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही सामानाचे व धान्याचे नमुने लॅबकडे पाठविले आहेत. त्यांच्या रिपोर्टनुसार आम्ही कारवाई करणार आहोत. परंतु, डोळयाला दिसणार्‍या खराब धान्यांबाबत बोलण्याचे त्यांनी टाळले आहे. तसेच, काही शाळांनी धान्यांचे नमुने देताना ते योग्य प्रकारे साफ करून दिले असल्याचेदेखील समजत आहे. त्यामुळे एकंदरीत लॅबला जरी धान्य पाठविले तरी कशावरून ठेकेदार त्याला हवे तसे रिपोर्ट लॅबमधून काढून घेऊ शकणार नाही. धान्य खराब असतानासुध्दा लॅबला पाठविले गेले यावरून अधिकारी वर्गाची मानसिकता दिसून येत आहे.

Exit mobile version