दौरा रद्द का झाला?

मुख्यमंत्र्यांची इंग्लड-वारी लांबणीवर; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आठ दिवसीय परदेश दौरा अचानक रद्द झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे 1 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या काळात जर्मनी आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार होते. जर्मनीतील रस्त्यांशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाची पाहणी आणि ब्रिटनमध्ये गुंतवणुकीशी संबंधित चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यात करण्यात आले होते. मात्र हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या हा निर्णय घेण्यात आला असला तरी काही दिवसांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन केले जाईल, असे प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मात्र याबाबत विविध राजकीय तर्कवितर्क सुरु झाले आहेत.

सर्वाच्च न्यायालयाने विलंबावरून फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रेबाबतच्या सुनावणीस सुरुवात केली आहे. काल याप्रकरणी सुनावणी होऊन दोन्ही गटांची बाजू ऐकल्यानंतर पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कालच्या सुनावणीत सर्व 34 याचिकांची एकत्रित सुनावणी घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. तसे झाल्यास ते शिंदे गटाला अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे याबाबत नव्याने न्यायालयीन डावपेच आखण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठीच शिंदे मुंबईत थांबले आहेत असे बोलले जाते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या परदेश वारीत मंत्रिमंडळातील इतर काही सहकारी आणि प्रशासकीय अधिकारीही सहभागी होणार होते. तसंच मुख्यमंत्री शिंदे हे ब्रिटन दौऱ्यात 3 ऑक्टोबर रोजी तेथील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे भारतात आणण्यासाठी सामंजस्य करारावर सह्या करतील, असं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितलं होतं. मात्र आता मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुधीर मुनगंटीवार हे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी जातील, असे समजते. इंग्लंडसह जर्मनी असा 10 दिवसांचा परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला याचाच अर्थ तो सरकारी दौरा नव्हता तर मुख्यमंत्र्यांची परदेशी पिकनिक होती, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्यावरुन राजकारण तापलं होतं. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून लिहिले, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या बहाण्याने आयोजित केलेल्या परदेशी पर्यटनावर प्रश्न विचारणारे ट्वीट मी काल केले होते. मी केलेल्या ट्वीटनंतर अर्ध्या तासातच त्यांनी आपला दौरा पुढे ढकलला. यावरून स्पष्ट होते की, हा दौरा म्हणजे राज्याच्या कामासाठीची बैठक नसून निव्वळ परदेशवारी होती. मागे देखील दावोसच्या 28 तासांच्या सहलीवर बेकायदा मुख्यमंत्र्यांनी करदात्यांच्या 40 कोटींचा चुराडा केला होता.

सरकारच्या परदेश दौऱ्यातून राज्याला काही लाभ होणार असेल तर त्याला आमचा विरोध नाही. पण करदात्यांच्या पैशावर बेकायदा मुख्यमंत्र्यांनी सुट्टीवर जाण हे आम्हाला मंजूर नाही. मी प्रश्न विचारताच ही मसहलफ रद्द झाली. असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाच्याही ट्विटला घाबरून दौरा रद्द केलेला नाही .राज्यात अवकाळी पाऊस झालाय, काही ठिकाणी पाऊस झालेला नाही. यामुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असताना परदेश दौऱ्यावर जाणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी कळविले आहे. असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळाचे कारण पुढे करून दौरा रद्द केला असल्याचे शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत सांगत आहेत. मात्र दुष्काळाची स्थिती आज अचानक उदभवलेली नाही. त्यामुळे ते कारण पटणारे नाही असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Exit mobile version