प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

प्रशासनाकडून फक्त बघ्याची भूमिका

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यासह संपूर्ण शहरामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे. कोणत्याही छोट्या दुकानात किंवा टपरीवर बिस्किटचा एक पुडा घेतला तरी प्लास्टिकची पिशवी मागून घेतात. शहरातून उचलल्या जाणार्‍या कचर्‍यामध्ये सर्वात जास्त दिसतात त्या प्लास्टिकच्या पिशव्याच. अनेक वेळा गटारांमध्ये किंवा नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या अडकल्याने शहरामध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. मात्र, प्लास्टिक पिशव्यांवर बंदी जाहीर करूनसुद्धा बाजारामध्ये पिशव्या उपलब्ध होतातच कशा? हादेखील प्रश्‍न महत्त्वाचा आहे.

प्लास्टिक पिशव्यांबरोबरच कुरकुरे, वेफर्स यासारख्या पॅकिंगच्या पिशव्यांवरदेखील बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, हे प्लास्टिक केव्हाही कुजून जात नाही. नागरिकदेखील बाजारामध्ये खरेदी करायला जाताना सोबत कापडी पिशवी नेण्याचे टाळतात. कारण बाजारामध्ये प्लास्टिक पिशवी मागितल्यावर ती सहज उपलब्ध होते. त्यामुळे पाच रुपयांच्या खरेदीपासून शंभर रुपयांच्या खरेदीपर्यंत पिशवी लहान-मोठ्या आकारात दिली जाते.

अशाच प्रकारे प्लास्टिक पिशव्यांचा खच आराठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळतो. त्या ठिकाणी घनकचर्‍याचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. त्या ठिकाणी असलेल्या इमारतींचे सांडपाणीदेखील मुख्य रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरलेले पाहायला मिळते. तरी, श्रीवर्धन नगरपरिषद व तालुका प्रशासनाने या ठिकाणी होणार्‍या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

Exit mobile version