| पनवेल | वार्ताहर |
वलप येथील संगीता आगवणे या महिलेची हत्या आणि दागिने चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शरद साहू याला अटक केली होती. तिच्याकडील दागिन्यांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीची पत्नी मंजुळा शरद साहू (39) आणि मुलगी सोनिया राहुल साकेत (20) या दोघींना अटक केली. या दोघींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
संगीता आगवणे या महिलेच्या हत्येप्रकरणी तब्बल दीड महिन्यांनंतर गुन्हे शाखा कक्ष दोन यांनी हत्येतील आरोपी शरद साहू याला अटक केली. आरोपीने महिलेची हत्या करून दागिने आणि मोबाईल घेऊन पोबारा केला होता. त्यानंतर शरद साहू याने मयत महिलेचे दागिने विकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ज्वेलर्सने त्याच्याकडून दागिने घेतले नाहीत. त्यानंतर ते दागिने त्याने पत्नीला आणि मुलीला दिले. त्यातील काही दागिने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विकले आणि काही दागिने नव्याने बनवून वापरण्यासाठी घेतले. त्यानंतर मृत महिलेचा चोरलेला मोबाईल साहू याने मध्य प्रदेशातील जावयाला दिला. जावयाने त्याचे सिम कार्ड टाकून मोबाईल फोन चालू केला असता लोकेशनद्वारे गुन्हे शाखेचे पोलीस मध्य प्रदेश येथे पोहोचले. त्यांनी जावयाकडे चौकशी केली असता हा मोबाईल त्याचा सासरा शरद साहू यांनी दिला असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी शरद साहू याला अटक केली. चोरीच्या दागिन्यांबद्दल त्याच्याकडे चौकशी केली असता ते दागिने विकले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याची पत्नी आणि मुलगी यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दागिने हस्तगत केले आहेत. शरद साहू याला न्यायालयात हजर केले असता 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.







