| भुज | प्रतिनिधी |
गुजरातमधील भुज येथे बळजबरीच्या बालविवाहातून निर्माण झालेल्या तणावामुळे 18 वर्षीय पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह विहरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मोहसिन मामन (18) असून मृत महिलेचे नाव गुलसुम मामन (19) आहे. गावातील परंपरांनुसार सुमारे दोन वर्षांपूर्वी दोघांचा बालविवाह लावण्यात आला होता. मात्र, मोहसिनचा या विवाहाला विरोध होता. लग्नाआधीपासूनच त्याचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. हे संबंध गेल्या पाच वर्षांपासून सुरू होते आणि विवाहानंतरही त्याने ते तोडले नाहीत. या कारणावरून मोहसिन आणि गुलसुम यांच्यात सतत वाद होत होते. पत्नी आपल्याला प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याची भावना मोहसिनच्या मनात निर्माण झाली होती, असा पोलिसांचा संशय आहे. त्याच तणावातून शुक्रवारी रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. वादाच्या भरात मोहसिनने गुलसुमचा सुऱ्याने गळा चिरून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून मोटारसायकलवरून शेतात नेण्यात आला आणि जवळच्या विहिरीत फेकून देण्यात आला. पोलिसांनी काही तासांतच मोहसिन मामनला अटक केली आहे.
बळजबरीच्या बालविवाहातून पत्नीची हत्या
