| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईमधील कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये पतीने पत्नीची हत्या करून स्वतः वर वार केल्याची घटना बुधवारी (दि.11) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गणेश शिरसाट याने चरित्र्याचा संशय घेत पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकूने वार केले आहेत. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असून, जखमी पतीवर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी पतीने मुलांच्या समोरच पत्नीची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये पतीने पत्नीची हत्या करून स्वतः वर वार केल्याची घटना घडली आहे. गणेश शिरसाट याने चरित्र्याचा संशय घेत पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकूने वार केले आहेत. पतीने दोन लहान मुलांच्या डोळ्यादेखत हत्या करुन स्वत:चा हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला असून जखमी पतीवर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पत्नी झोपेत असताना पत्नीचा खून केल्याचे चौकशीत समोर आले आहे. दोघांना 8 आणि 2 वर्षांची दोन मुले असून, आठ वर्षांचा मुलगा दिव्यांग आहे. या घटनेची तक्रार वैशाली पाटील यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दिली आहे. शिरसाट कुटुंब चार-पाच महिन्यांपूर्वीच या अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते. गौरी ही पेशाने आरोग्य सेविका होती तर गणेश बेरोजगार होता. सुरुवातीला दोघांचे संबंध चांगले होते, मात्र नंतर गणेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला आणि त्यामुळे सतत भांडणे होत होती. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. दोन निष्पाप बालकांचे भवितव्य अधांतरी राहिले असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप दुपटे हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.