पत्नीकडील अपहरणाचा आरोप खोटा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

अफताब यांनी प्रसिद्धी पत्रकामार्फत केला दावा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मुलीचे अपहरण केल्याचा आरोप करीत पत्नीने वृत्तपत्रात प्रसिद्धी करून बदनामी केली आहे. आई, वडिलांवर केलेले आरोपही पूर्णतः खोटे असल्याचा दावा अफताब नजीर सुबेदार यांनी प्रसिद्धी पत्रकामार्फत केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण आले आहे.

अफताब नजीर सुबेदार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी हुमेरा यांच्यासोबत 9 डिसेंबर 2022 मध्ये मुस्लीम रितीरिवाजानुसार विवाह झाला. दोघांचा संसार दोन ते तीन महिने सुखी समाधानाने झाला. मात्र, त्यानंतर त्यांची पत्नी माहेरी नेण्यासाठी सतत त्यांच्या आई, वडिलांसह अफताब यांच्यासोबत भांडण करू लागली. पत्नी तिच्या आईच्या सांगण्यावरून वेगळे राहण्यास सांगत होती. 12 ऑगस्ट 2025 मध्ये कामानिमित्त बाहेर असताना त्यांच्या पत्नीने अफताब यांच्या आईला मारहाण करून लग्नातील सोन्याचे दागिने बळजबरीने घेऊन गेली. त्यानंतर अफताब यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांच्याकडे येऊन राहण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. 12 ऑक्टोबरला रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अफताब यांच्या पत्नीने फोन करून तुमची आठवण येते, असे सांगितले. 13 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अलिबाग एसटी स्थानकाजवळ दोघेही भेटलो. त्यावेळी अफताब यांनी त्यांच्या पत्नीला घरी नांदण्यास आग्रह करून कामाला न जाण्यास सांगितले. मात्र, त्यांच्या पत्नीने तुम्हाला सोडून देईन, पण नोकरी सोडणार नाही, असे सांगत यापुढे माझ्या मुलीचे नखसुद्धा दिसू देणार नाही, असे त्या म्हणाल्या. आई, वडिलांना भेटण्यास सांगून पत्नीच्या सहमतीने मुलीला अफताब त्यांच्या घरी घेऊन गेले. सात दिवस अफताब यांच्या ताब्यात त्यांची मुलगी होती. मुलीला 19 ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाण्यात देण्यात आले. त्यावेळी पोलिसांकडून जबाब घेण्यात आला. मात्र, मुलीचे अपहरण करून बदनामी करण्याचा आरोप पत्नीने केला आहे. आई, वडिलांसह अफताब यांच्यावर केलेले आरोपही खोटे असल्याचा दावा अफताब यांनी प्रसिध्दी पत्रकामार्फत केला आहे.

Exit mobile version