। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील उलवे साई मंदिर येथून मुकेश पाटील यांचा नेचर फ्रेण्ड सोसायटी पनवेल या संस्थेचे अध्यक्ष संतोष उदरे यांना कॉल आला. त्यांच्या प्लांटवर एक मांजरीचे पिल्लू क्रशर प्लांटच्या तोडलेल्या दगडांमध्ये अडकले आहे आणि ते पिल्लू घरात पाळली जाणार्या मांजरीच्या पिल्लापेक्षा थोडं वेगळं दिसत आहे, असे त्यांना सांगण्यात आले. संतोष उदरे यांनी लगेच उरण वनपरिमंडळाचे आर.एफ.ओ. विष्णू कोकारे यांना फोन करुन कळविले आणि सहकारी शार्दूल वारंगे यांना घेऊन घटनास्थळी पोहचले. तसेच, उरण वनपरिमंडळाचे भाऊसाहेब संजय पाटीलही घटनास्थळी पोहचले.
यावेळी घटनास्थळी पाहणी केली असता जंगल मांजरीची तीन पिल्ले दगडखाणीत मध्यभागी अडकलेली दिसली. ती पिल्ले दोन-तीन दिवसांपासून तिथे अडकली असल्याने तेथील कामगारांनी दगड तोडण्याचे काम बंद ठेवले होते. आर.एफ.ओ. कोकारे यांच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या शर्तीने त्या तीन पिल्लांची यशस्वी सुटका करण्यात आली. या रेस्न्यू ऑपरेशनमध्ये भाऊसाहेब पाटील, संस्थेचे अध्यक्ष संतोष उदरे व संस्थेचे शार्दूल वारंगे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.