रानभाज्या मानवी आरोग्याला पोषक

कृषी उपविभागीय अधिकारी रविशंकर कावळेंचे प्रतिपादन

| माणगाव | प्रतिनिधी |

निसर्गावर निर्माण होणार्‍या रानभाज्या मानवी आरोग्यासाठी गुणकारी आहेत. या भाज्यांवर कोणतेही रासायनिक खत किंवा विषारी कीटकनाशक औषध फवारणी केलेली नसते. या निसर्गातून तयार होतात. त्यामुळे या रानभाज्या मानवी आरोग्याच्यादृष्टीने खाण्यासाठी पोषक आहेत, असे प्रतिपादन माणगाव कृषी उपविभागीय अधिकारी रविशंकर कावळे यांनी माणगाव येथील रानभाजी महोत्सवात बोलताना केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) अंतर्गत दि. 23 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय सभागृह, माणगाव येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन दशरथ काळे, तहसीलदार माणगाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी रानभाज्यांच्या पाककृती स्टॉलला भेट देऊन शेतकरी गटाने सादर केलेल्या पाककृतीची माहिती घेतली. तालुका कृषी अधिकारी माणगाव अजय वगरे यांनी प्रस्तावनेमध्ये उपस्थित शेतकर्‍यांना मानवी आरोग्यामध्ये रानभाज्यांचे महत्त्व पटवून सांगितले, तसेच रानभाज्या उत्पादक शेतकर्‍यांना तालुक्यातील गृहनिर्माण सोसायटीमध्ये रानभाजी विक्री करण्याबाबत मार्गदर्शन केले. या महोत्सवात भाले हायस्कूलचे शिक्षक विलास शिरसे यांनी उपस्थितांना रानभाज्यांचे औषधी महत्त्व, त्यांची ओळख इत्यादीबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. भावना जाधव यांनी रानभाज्यांचे मानवी आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

रानभाजी महोत्सवामध्ये मौजे. कोस्ते येथील श्रीराम महिला बचत गटाच्या सदस्यांनी कुर्डु, भारंगी, कारटोळी, अळू, तेरी, टाकळा, कुडा, अळंबी, गुळवेल, गवती चहा, बेल, अडुळसा, कोरफड, बांबू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या व औषधी वनस्पती विक्रीसाठी ठेवल्या होत्या. तसेच ममता धुरी यांनी 15 रानभाज्यांची पाककृती तयार करून प्रदर्शनात सादर केली होती. गीता साळवी यांनी तांदळाची कनवली, कोथिंबीर वडी, तृणधान्यापासून खीर इत्यादी नवनवीन पदार्थ पाककृतीद्वारे सादर केले होते. दरम्यान, तालुक्यातील ग्राहकांकडून, विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून रानभाजी खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सुरडकर यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व कार्यक्रमाची सांगता संजय ससाने मंडळ कृषी अधिकारी गोरेगाव यांनी केली. मंडळ कृषी अधिकारी इंदापूर सुयश नलावडे, आत्मा यंत्रणेचे तंत्रज्ञान व्यवस्थापन प्रमोद शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाला माणगाव तालुक्यातील 165 पेक्षा जास्त शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी, शेतकरी गटांचे सदस्य तसेच कृषी विभागाचे सर्व कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तसेच तालुक्यातील इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version