नेरळ बाजार पेठ रानभाज्यांनी फुलला
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आदिवासी महिला या डोंगरातील रानभाज्या आणि आपल्या घराच्या आवारात बनवलेल्या रानभाज्या या बाजारात घेऊन येत आहेत. कर्जत आणि नेरळ येथील बाजार पेठेत आदिवासी लोक थेट बाजारात रानभाज्यांचा व्यवसाय करू लागल्या आहेत. रानभाज्या आणि पारंपरिक शेतीचा आधार मिळू लागला असून, आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळत आहे.
कर्जत तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील अनेक आदिवासी बांधव आपल्या घराच्या परिसरात तसेच उपलब्ध असलेल्या छोट्या-मोठ्या शेतजमिनीत विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करतात. याशिवाय पावसाळ्यात जंगल, डोंगराच्या कड्याकपारी, शेताच्या बांधावर तसेच मोकळ्या जागेत नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्या गोळा करून त्या विक्रीसाठी कर्जत बाजारपेठेत आणल्या जातात. शहरातील बाजारपेठेत पहाटेपासूनच या आदिवासी महिला आपल्या डोक्यावरील टोपल्या, पोती किंवा टोपल्यांमध्ये विविध प्रकारच्या भाज्या घेऊन दाखल होताना दिसतात. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेत पोहोचल्यानंतर त्या आपल्या भाज्यांची घाऊक दराने विक्री करतात.
परिसरातील आदिवासी बांधवांच्या जीवनात रानभाज्यांना विशेष महत्त्व आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जंगल आणि डोंगराळ भागात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या विविध रानभाज्या गोळा करून त्यांचा घरगुती आहारात वापर केला जातो. त्याचबरोबर अतिरिक्त रानभाज्या बाजारात विकून उत्पन्नही मिळविले जाते. काही रानभाज्यांना स्थानिक बाजारपेठेत विशेष मागणी असते. मात्र, जंगलातून रानभाज्या गोळा करण्याचे काम सोपे नसते. डोंगर-दऱ्या, कड्याकपारी आणि जंगलातील विविध भागात फिरून या भाज्या गोळा कराव्या लागतात.
घराच्या परिसरात शिरळी, घोसाळी, पडवळ, भेंडी, वांगी, काकडी आणि कारली यांसारख्या भाज्यांची लागवड केली जाते. तसेच शेताच्या बांधावर अळू, डांगरा (भोपळा), तोंडली यांसारख्या वेलवर्गीय भाज्याही लावल्या जातात. ही शेती मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक नसली, तरी कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच अतिरिक्त उत्पादन बाजारात विकून रोख उत्पन्न मिळविण्यासाठी तिचे महत्त्व मोठे आहे. आदिवासी समाजाची जीवनपद्धती ही निसर्गाशी जोडलेली आहे. जंगलातील उपलब्ध साधनसंपत्तीचा पारंपरिक पद्धतीने उपयोग करताना त्यातून अन्न, रोजगार आणि उत्पन्न मिळविण्याची पद्धत आजही अनेक कुटुंबांनी जपली आहे. स्थानिक शेतमालाला बाजारपेठ, पारंपरिक रानभाज्यांना योग्य मूल्य आणि आदिवासी बांधवांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळाला, तर त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला निश्चितच अधिक बळ मिळू शकते.
