सरसगड किल्ल्याला वणवा

| पाली | वार्ताहर |

पाली येथील सरसगडाला अचानक लागलेल्या वणव्यामुळे वाताहत झाली आहे. शिवप्रेमींकडून किल्ल्यावर लावण्यात आलेली सर्व झाडे या आगीत जळून खाक झाली आहेत. शिवाय अनेक वन्यप्राण्यांनादेखील या आगीची झळ बसली आहे.

पालीतील सरसगड किल्ल्यावर बुधवारी (दि. 21) मोठा वणवा लागला होता. या वणव्यामुळे किल्ल्याचा बहुतांश भाग जळून होरपळला. यामध्ये किल्ल्यावर नव्याने लावलेले रोपे व संवर्धन केलेली झाडे जळून खाक झाली आहेत. शिवाय येथील माकडे, रानडुक्करे, वानरे व पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच, त्यांचा अधिवासदेखील नष्ट झाला आहे. प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेले पाली हे गाव सरसगडाच्या कुशीत वसले आहे. सरसगडाच्या दुरुस्तीसाठी दोन हजार होन खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी मंजूर केल्या होत्या. यानुसार दुर्गमता व विपुल जलसंचय यावर विशेष भर देऊन गडाची बांधणी करण्यात आली होती. दूरवर टेहळणी करण्यास व इशारा देण्यास सरस म्हणून किल्ल्यास सरसगड नाव देण्यात आले होते. मात्र, वणव्यामुळे किल्ल्याची वाताहत झाली आहे.

बुरूज ढासळले
सरसगडाच्या पायथ्याशी असलेल्या तळई व घेरासुधागड गावासमोरील किल्ल्याचे बुरूज ढासळले आहेत. तसेच, किल्ल्याच्या चारही बाजूने वणवे लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली आहे. त्यामुळे येथे राहणार्‍या पशु-पक्ष्यांची अन्नपाण्यासाठी वाताहत होत आहे. येथे राहणारे मोर, माकड, रानडुक्करे आदी प्राणी अन्नपाण्यासाठी गावात येत आहेत. वणव्यामुळे तटबंदी, बुरूज आदी बांधकामदेखील ढासळत आहेत.
Exit mobile version