रानफुलांना बहर; निसर्ग प्रेमींचा आकर्षणाचा विषय

| माणगाव | वार्ताहर |

वसंत ऋतूला सुरूवात झाली आहे. उन्हाचा पारा चढत असताना रानावनात मात्र उन्हाळी रानफुलांचा, फळांचा बहर सुरु झाला आहे. उन्हाळ्यात जंगलात विविध प्रकारची फुले, फळे बहरून येतात. चैत्र महिन्यात झाडांना पालवी फुटली असून या पालवीतच बहावा, निवडुंग, गुलमोहर, पळस, चाफा, सावर इत्यादी झाडांची फुले तर आंबा, काजू, फणस, बोरे, टेंभुर्णी इत्यादी रान फळांची झाडे बहरली आहेत. वृक्षांना मोठ्या प्रमाणात फुलांचा, फळांचा बहर आला आहे. रानावनात झाडांना पालवी बरोबरच आलेला हा बहर निसर्गप्रेमी, पर्यटक यांच्या आकर्षणाचा विषय होत असून निसर्गातील उन्हाळ्याच्या काहिलीत बहरणारी रानफुले, रानफळे निसर्गाची शोभा वाढवित आहेत.

उन्हाळा हा काहीसा उदासवाना ऋतू असतो. झाडांची पानगळ, उन्हाची वाढणारी काहीली व भकास वाटणारे रान असे काहीसे चित्र सर्वत्र दिसते. मात्र याच ऋतूत रानातील अनेक फळ झाडे, फुल झाडे फुलून येतात यामुळें उन्हाळ्याच्या दिवसात रानाची शोभा वाढत असून रानावनात झाडांना उन्हाळी रान फुलांचा बहर आलेला दिसत आहे.कोकणातील सह्याद्री पर्वताची कडे कपारीत, रस्त्यांच्या दुतर्फा, शेत शिवारात असंख्य प्रकारच्या फळ, फुल झाडांना पालवी बरोबरच फुलांचे गुच्छ, फळ आले आहेत.

Exit mobile version