। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पाली नगरपंचायत क्षेत्रात जागोजागी तुंबलेली गटारे व नाले हे नेहमीचं चित्र आहे. हे चित्र बदलण्याचे पाली नगरपंचायतीने मनावर घेतले आहे. त्याच अनुषंगाने पाली शहरात नगरपंचायतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, पाली नगरपंचायत हद्दीतील गटारे स्वच्छ करण्याचे व गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. पाली नगरपंचायतीचे नगरसेवक आपापल्या वॉर्डमध्ये जातीने लक्ष देत गटारे स्वच्छ करण्याचे काम करुन घेत आहे.
ही साफसफाई करताना, सफाई कामगारांना बर्याच अडचणी येत आहेत. कित्येक ठिकाणी गटारांवर दुकानदारांनी कायमस्वरूपी स्लॅब टाकले आहेत. तसेच काही ठिकाणे गटारांवर बांधकामे करण्यात आली आहेत. याठिकाणी सफाई कामगारांना गटारे साफ करता येत नाहीत. त्यामुळे बाटल्या, कचरा अडकून पाणी तुंबत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे गरजेचे आहे, तसे न केल्यास गटारे साफसफाई हा केवळ एक फार्स आहे, अशी भावना आमच्या मनात निर्माण होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पाली नगरपंचायत हद्दीतील गटारांवरील अनधिकृत बांधकामांवर पाली नगरपंचायत कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.




