शिंदे गट आक्रमक होण्याची शक्यता
| रायगड | प्रतिनिधी |
जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटामध्ये अद्यापही तणावाचे वातावरण आहे. मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यापैकी कोणीच माघार घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता खा. सुनील तटकरे यांनी पालकमंत्रीपदावरुन मंत्री गोगावले यांना डिवचले आहे. पंचांनी निर्णय दिला, तर तो काहींना पटत नाही; मात्र, काही वेळाने पंच बरोबर होते, याची प्रचिती सर्वांनाच येते. खा. तटकरे यांनी पंचांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचे सूचक वक्तव्य करुन रायगडच्या पालकमंत्रीपदाची माळ मंत्री आदिती तटकरे यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे अधोरेखित केल्याचे दिसून येत आहे.
मंत्री गोगावले यांना पालकमंत्रीपदावरुन पुन्हा डिवचल्याने शिंदे गट आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खा. तटकरेंना मंत्री गोगावले कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा राज्यभरात चर्चिला जात आहे. एक महिन्यानंतरही पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले नाही. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, त्यांचे पालकमंत्री होण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यादेखील पालकमंत्रीपदी आपलीच वर्णी लागावी यासाठी प्रबळ इच्छा बाळगून आहेत.
पालकमंत्रीपदाचा तिढा जितका सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय, तितका गुंता अधिक वाढत चालला आहे. त्यामुळे महायुती सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची नावे स्पष्ट केलेली नाहीत. तटकरे आणि गोगावले हे यावरुन एकमेकांना सतत टीका करताना दिसून येतात. खासदार सुनील तटकरे हे एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी मंत्री गोगावले यांना कोपरखळ्या लगावल्या. पंचांनी दिलेल्या निर्णयावर अपील जरुर करावे, मात्र त्यासाठी मर्यादा आखून घेणे गरजेचे असल्याचे खा. तटकरे म्हणाले आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. मात्र, ज्या संघाचा कर्णधार भडक डोक्याचा असेल, तर त्यातील खेळाडूदेखील तसेच वागतात आणि सामन्याची पुरती वाट लावून टाकतात, असा टोलाही त्यांनी लगावला. या कार्यक्रमात त्यांनी टोणपे आणि सल्ले देताना कोठेही मंत्री भरत गोगावले यांचे नाव घेतले नाही.