15 दिवसांत धावपट्टी बांधून देतो

गडकरींनी हवाई दलाला दिला शब्द
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सशस्त्र दलाच्या विमानांसाठी इमर्जन्सी लँडिंग फील्ड दीड वर्षांऐवजी केवळ 15 दिवसांमध्ये तयार केल्या जातील, असा शब्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हवाई दलाला दिला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बाडमेरमधील राष्ट्रीय महामार्ग 925वरील सट्टा-गंधव मार्गावर धावपट्टी बांधण्यास सुमारे 19 महिने लागले होते.
भारतीय हवाई दलाने गुरुवारी पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या इमर्जन्सी लँडिंग फील्ड (ईएलएफ)चे उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
एनएच 925 हा भारताचा पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे, जो भारतीय हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी वापरला जातो. गडकरी म्हणाले, सशस्त्र दलांनी येथे एक लहान विमानतळ तयार केले पाहिजे. माझ्या माहितीनुसार, येथे जवळपास 350 किमी परिसरात कोणतेही विमानतळ नाही. मी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांना इथे एक लहान विमानतळ तयार करण्यास सांगितलं आहे. त्यासाठी जर तुम्हाला जमीन हवी असेल, तर आम्ही ती तुम्हाला देऊ. तुम्ही तिथे आपल्या विभागांतर्गत उपक्रम देखील राबवू शकता. तसेच जर खासगी विमान कंपन्यांनी एक किंवा दोन दैनंदिन उड्डाणे सुरू केली तर स्थानिक लोकांनाही त्याचा फायदा होईल, असं गडकरी म्हणाले.

Exit mobile version