स्वत:चा संघ तयार करणार: महेंद्रसिंग धोनी

| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

धोनीने केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. धोनीने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, आता झेप घेण्याची वेळ आली आहे. जे महत्त्वाचे आहे ते करण्याची वेळ आली आहे. मी माझी स्वतःची टीम सुरू करत आहे. पण, धोनी त्याचा संघ कोणत्या आधारावर तयार करणार, त्याची रूपरेषा आणि पुढील मार्ग काय असेल याबाबत त्याने काहीच स्पष्ट केले नाही. खरे तर धोनीचे हे पेड प्रमोशन आहे.

भारतीय संघाचा माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनी केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर माही निवृत्त होईल अशी अटकळ बांधली जात होती. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून चेन्नईचा संघ बाहेर पडला आहे. अशातच आता सर्वांच्या लाडक्या माहीने फेसबुकवर एक पोस्ट करत चाहत्यांना संभ्रमात टाकल्याचे दिसते.

धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला आहे. धोनी कर्णधार असताना भारताला एक ट्वेंटी-20 विश्‍वचषक, एक वन डे विश्‍वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश आले. शेवटच्या वेळी 2013 मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसीचा किताब जिंकला होता. तेव्हापासून आजतागायत भारताच्या खात्यात ट्रॉफीचा दुष्काळ आहे.

Exit mobile version